इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुरबार : आपल्या देशात अनेक प्रथा परंपरा आहेत, त्यात काही अनिष्ट प्रथा देखील चालत आलेल्या आहेत, यामुळे समाजाचे मोठे नुकसान होते. त्यातच डाकीण हा प्रकार होय, अद्यापही दुर्गम, आदिवासी भागात डाकीण असल्याचे अंधश्रद्धा दिसून येते, त्यामुळे अनेकदा डाकीण मानलेल्या स्त्रीला ठार मारण्याचे प्रकार देखील घडले आहेत. वास्तविक ती डाकीण किंवा चेटकीण नसते, यासाठी समाजात अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या वैशिष्ठय़पूर्ण आदिवासी संस्कृतीतील एक वेगळा अन् भयावह पदर असलेली डाकीण प्रथा नष्ट करण्याची मोहीम पोलीस यंत्रणा, अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सातपुडा पर्वतराजीत सुरू केली आहे, तिला अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. कारण डाकीण समजून एका पती – पत्नीला स्मशानातील राख खाऊ घालण्यात आली.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘अनिस ‘ द्वारे समाजातील वेगवेगळा घटक जोडला जात असताना मागासलेल्या अशिक्षित घटकाच्या जनजागृतीवर प्राधान्यक्रमाने लक्ष केंद्रीत करावे लागेल. डाकीण ठरविण्याचा प्रकारच भविष्यात आपल्या गाव व परिसरात घडणार नाहीत, याची खबरदारी बाधीत गावात स्थापन झालेल्या डाकीण प्रथा निर्मूलन समित्यांनी घेतल्यास आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने ते पुढचे पाऊल ठरेल. कारण नंदूरबार जिल्हयात जादूटोणा करून युवक व महिलेला मारून टाकल्याचा आरोप करीत स्मशानभूमीत नेऊन राख खाऊ घालत महिलेला व तिच्या पतीला वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक पूजा केल्याची घटना ओघाणी (ता.अक्कलकुवा ) येथे घडली. याबाबत मोलगी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाने या स्वरूपाच्या गुन्ह्यातील संशयितांना कठोर शिक्षा होईल, अशी तरतूद केल्यास अंधश्रध्देच्या बळी ठरलेल्या असहाय्य महिलांना न्याय मिळवून देता येईल.
अद्याप अंधश्रध्देचा पगडा कायम
महाराष्ट्र सरकारने २०१३मध्ये “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम २०१३”, हा कायदा संमत केला. हा फौजदारी कायदा आहे. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा, असेही म्हटले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी १६ वर्षे संघर्ष केला. त्यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला होता. सरकारने यासंदर्भातील विधेयक विधिमंडळात मांडले. दाभोळकर यांच्या हत्येनंतर काही दिवसांनी सरकारने २६ ऑगस्ट २०१३ रोजी वटहुकूम काढला. त्यानंतर १३ डिसेंबर २०१३ ला विधानसभेत आणि २० डिसेंबर २०१३ ला विधान परिषदेत विधेयक संमत होऊन वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर झाले. हे विधेयक जवळपास सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने संमत झाले. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
मात्र अद्याप अंधश्रध्देचा पगडा कायम आहे.
ओघाणीचा चापडापाडा, ता.अक्कलकुवा येथील ५० वर्षीय महिलेवर संशय घेऊन तिने जादूटोणा करून ओजमा वसावे यांच्या मुलाला व खेमा वसावे यांच्या पत्नीला मारल्याचा संशय घेऊन जमावाने महिला व तिच्या पतीला गावात त्रास देणे सुरू केले. पती-पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना तांत्रिक पूजा करायला भाग पाडले. तसेच स्मशानात घेऊन जाऊन राख खाऊ घातली. या सर्व भयानक प्रकाराला कंटाळलेल्या व प्रचंड दहशतीत आलेल्या महिलेने व तिच्या पतीने अखेर पोलिस ठाण्यात जाऊन ही घटना कथन केल्यानंतर फिर्याद दाखल केली. त्यामुळे ओजमा वसावे (५८), गुला वसावे (३०), ईल्या वसावे (२८), खेमा वसावे (५२), चंद्रसिंग वसावे (२७) व बावा पाडवी (५५) यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Outrageous… Husband and wife fed ashes from crematorium… Shocking case in Nandurbar district