मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील संगमेश्वर भागातील नवनाथ गणेश मंडळाने यंदा नऊ नद्यांच्या वाळूपासून शिवाच्या स्वरुपातील गणेश मुर्तीचा स्थापना केली आहे. नर्मदेच्या वाळू बरोबरच सारंगखेडा व जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून वाळू आणत त्यातून शिवाच्या रुपातील गणेशाची मूर्ती साकारण्यात आली.
ही गणेशाची मुर्ती पाहण्यासाठी जातांना गुहेतून जावे लागत असल्याने गणेश भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. मालेगावमध्ये नवनाथ मंडळाने साकारलेला देखावा सध्या सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. खरे तर मालेगावमध्ये गणेश मंडळाची देखावे सादर करण्याची परंपरा ही विसर्जनाच्या एक दिवस अगोदर असायची.
मात्र गेल्या काही वर्षापासून ही परंपरा मोडीत काढत अनेक मोठ्या मंडळांनी देखावे सादर करण्यास सुरुवात केल्याने गणेश भक्तांना अगोदरच देखावे पहाण्यास मिळत आहे.