इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः येत्या २४ तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील. दहा तारखेपर्यंत मॉन्सून महाष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात ‘अल निनो’चा प्रभाव कमी झाला असून ‘ला निना’ सक्रिय झाला आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
या वेळी केरळमध्ये वेळेआधी मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्याची सामान्य तारीख एक जून असते. तीन-चार दिवस तारीख पुढे किंवा मागे होणे सामान्य मानले जाते. या वेळी मॉन्सून दोन दिवस अगोदरच दाखल झाला आहे. केरळला मॉन्सून दाखल होण्याआधीच मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांत रेड अलर्ट तर इतर तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे.