नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– परप्रांतीय तरूणास लुटमार करणारे त्रिकुट पोलीसांच्या हाती लागले आहे. तरूणाने प्रसंगावधान राखत एकास पकडून ठेवल्याने भामट्यांना बेड्या ठोकण्यात यश आले असून, संशयितांच्या अटकेने जबरीचोरी आणि लुटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मच्छींद्र रंजन कांबळे (३० रा. खांडकर विटभट्टी चाळ,दत्तनगर), संदिप जगन्नाथ पाटील (३८ मुळ रा. वरणेपाडा ता.मालेगाव हल्ली गोकुळ विहार अपा.भगवतीनगर) व सनि गोटीराम बोराडे (३० रा.नंदिनी अगरबत्ती समोर ओझर मिग) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किशन छठ्ठू प्रसाद (१९ मुळ रा. उत्तरप्रदेश हल्ली साईनगर,अमृतधाम) या परप्रांंतीय फिर्याद दिली आहे. किशन प्रसाद बुधवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.
साईनगर येथील जयदुर्गा किराणा दुकानासमोरून तो जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यानी त्याची वाट अडविली. काही कळण्याच्या आत संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करून त्याच्या खिशातील पाकिटातून पैसे काढले यावेळी यावेळी प्रसंगावधान राखत किसन प्रसाद याने तिघांशी झाटापट करून आरडाओरड केल्याने संशयित पोलीसांच्या हाती लागले. पैसे काढून दुचाकीवर पळून जाण्याच्या प्रयत्नात प्रसाद याने दुचाकीवरील एकास खाली खेचल्याने तिघे पोलीसांच्या जाळ््यात अडकले. स्थानिकांनी धाव घेत पैसे टाकून पळण्याचा प्रयत्न करणाºया तिघाना पकडून पंचवटी पोलीसांच्या स्वाधीन केले. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.