नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोड भागात बिअरच्या बाटलीसाठी त्रिकुटाने दारू दुकान परिसरात दहशत माजविल्याची ही घटना घडली. या घटनेत ग्राहकांना मारहाण करीत त्रिकुटाने खंडणीची मागणी केली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिकेश सोळुंकी, कुणाल लोंढे व धनंजय डंबाळे (रा.तिघे म्हसरूळ) अशी संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत किशोर बबन ठाकरे (रा.मखमलाबाद नाका) यांनी फिर्याद दिली आहे. म्हसरूळ परिसरातील दिंडोरी लिकर वाईन शॉप भागात ही घटना घडली. ठाकरे मंगळवारी रात्री आपल्या वाईन शॉपमध्ये सेवा बजावत असतांना ही घटना घडली. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वाईन शॉपवर आलेल्या त्रिकुटाने बिअर बाटलीची मागणी केली.
यावेळी ठाकरे यांनी पैश्यांची मागणी केली असता संतप्त संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत व परिसरात दहशत माजविली. यावेळी दिसेल त्यास मारहाण करण्यास सुरूवात करून संशयितांनी ग्राहकाना पळवून लावले. याप्रसंगी संशयितांनी मद्याच्या स्वरूपात ठाकरे यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक हाके करीत आहेत.