इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणा-या कॅामेडियन श्याम रंगीलाचा अर्ज बाद झाला. देशातील लोकशाही किती धोक्यात आहे हे सांगण्यासाठी आपण लोकसभेसाठी अर्ज भरला होता, पण, माझा अर्ज बाद झाल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी रंगीलाने अर्ज भरला होता. त्यानंतर बुधवारी अर्ज छाननीत त्याचा अर्ज बाद झाला.
अर्ज बाद झाल्यानंतर तो म्हणाला की, सर्व पेपर्स आणि आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन आम्ही अर्ज भरला होता. पण, शपथेची पूर्तता केली नसल्याचे सांगत हा अर्ज बाद करण्यात आला. यावेळी तो पुढे म्हणाला की, वाराणसीला लढू देणार नाही, असे ठरले होते, हे आता स्पष्ट झाले आहे. हृदय नक्कीच तुटले आहे, पण हिंमत तुटलेली नाही. लोकांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. प्रसारमाध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती आहे की, कृपया आता फोन करू नका, मला जी काही माहिती मिळेल ती मी इथे देत राहीन, कदाचित आता काही वेळ बोलण्यासारखं वाटत नाही. असे त्याने सांगितले.