इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुंबई पोलिसांना अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा गुजरातमधील भुज येथे अटक केली.
दोन दिवसापूर्वी केलेल्या या गोळीबारामुळे खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी तातडीने तपास सुरु केला. व अवघ्या दोन दिवसात या आरोपींना गजाआड केले. सीसीटीव्हीच्या आधारवर सुरु झालेल्या या आरोपींचा शोध सुरु झाला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हे आरोपी गुजरातमध्ये सापडले.
१४ एप्रिलला पहाटे ४.५५ वाजता दोघांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सलमानच्या घरात गेली. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. गोळीबारानंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
गोळीबार करताना दोन्ही हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. हल्लेखोरांनी पांढरा टी-शर्ट आणि काळ्या स्वेट शर्ट घातला होता. दुसरा लाल टी-शर्टमध्ये होता. ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला, ती ७.६ बोअरची बंदूक असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून फॉरेन्सिक तज्ज्ञांना गोळी सापडली आहे. पोलिसांनी आरोपीची दुचाकीही जप्त केली आहे.