नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रेल्वेत मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाने तब्बल साडे सोळा लाख रुपयाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. बनावट नियुक्ती पत्रामुळे या प्रकरणामुळे फसवणुकीचा हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश वसंतराव मोरे (रा.कुसूमप्रेम अपा. सहदेवनगर गंगापूररोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत विजय दत्तात्रेय थिगळे (६८ रा.मोदकेश्वर कॉलनी, इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार थिगळे व संशयित मोरे यांच्यात २०२० मध्ये परिचय झाला होता. यावेळी रेल्वे खात्यात मोठ्या ओळखी असल्याचे भासवून संशयिताने थिगळे यांचा विश्वास संपादन केला.
मुलास नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भामट्याने थिगळे यांच्याकडून सुमारे १६ लाख १५ हजार ३०० रूपयांची रोकड उकळली. कालांतराने त्याने आयआरसीटीसी कंपनीचे बनावट नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र दिले. थिगळे यांचा मुलगा रेल्वेच्या संबधीत कंपनीकडे प्रशिक्षणासाठी नियुक्तीपत्र घेवून गेला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. घरी परतताच थिगळे यांनी पोलीसात धाव घेतली असून संशयितास इदिरानगर पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.