वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मराठीत वेगवेगळे विषय घेऊन चित्रपट येत आहेत. आता महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ या सिनेमा लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा अगोदर टीझर आला आता या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमात महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. गोविंद पाठक हे वृद्ध गृहस्थ त्यांच्या मुलाने त्यांच्या पत्नीचा खून केला अशी तक्रार घेऊन पोलिस स्टेशनला येतात आणि परदेशात राहणाऱ्या त्यांच्या मुलाविरुद्ध केस उभी राहते.
पत्नीच्या मृत्यूला गोविंद त्यांच्या मुलाला आणि सुनेला जबाबदार धरतात. मुलगा आणि वडिलांच्या या कोर्टातील लढाईवर हा सिनेमा आधारित आहे. आई-वडील मुलांप्रती असलेल्या कर्तव्यात कधीच कमतरता ठेवत नाहीत पण तीच मुले आई-वडील म्हातारे झाल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात? त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर का पडतो? हा प्रश्न या सिनेमातून विचारला गेला आहे.
या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. सिनेमाच्या संपूर्ण कास्ट आणि टीमने ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. गीतकार वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ या मैफिलीचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. केतकी माटेगावकर, स्वप्नील बांदोडकर आणि पवनदीप राज या गायकांनी सुद्धा हजेरी लावत गाणी सादर केली. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘काय चुकले सांग ना?’ या गाण्याच्या काही ओळी सादर केल्या. २६ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.