नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मतदान जनजागृतीसाठी शालेय स्तरावर नाविन्यपूर्ण उप्रकम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या, या अनुषंगाने रंगपंचमी सणाचे औचित्य साधत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी बोटाला शाई लावत मतदानाविषयी प्रबोधन केले. त्याचबरोबर मतदान हा शब्द विद्यार्थ्यांनी मानवी आकृतीतून तयार करत मतदान करण्याचा संदेश दिला.
येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृतीचा कार्यक्रम स्वीप समितीच्या वतीने राबविल्या जात आहे. याचाच भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकाच वेळी रंगपंचमीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी बोटाला शाई लावत मतदानाविषयी जनजागृती केली त्याचबरोबर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून विविध रंगांनी चित्र रेखाटत करत मतदान करा, आपला हक्क बजावा असा संदेश देत फलक तयार केले.
विद्यार्थिनींनी हातावर मेहंदी काढत त्यातून मतदान जनजागृती विषयी विविध संदेश दिले. याच सोबत जिल्ह्यातील शाळांमध्ये पालक सभा देखील घेण्यात आल्या यामध्ये मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या पालकांना पटवून देऊन १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.