संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचे असेल, तर जिद्द आणि चिकाटी आवश्यक असते. परीक्षेच्या बाबतीतही असेच म्हणता येईल, एमपीएससी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दरवर्षी हजारो विद्यार्थी परीक्षा देतात. मात्र सर्वांना यश मिळत नाही. मात्र अत्यंत जिद्दीने अभ्यास केल्यास अनेक अडचणीवर मात करून यश मिळू शकते. याची उदाहरण म्हणजे नगर जिल्ह्यातील एक गरीब कुटुंबातील मुलगी होय. संगमनेरच्या कल्याणीने सार्थ ठरवून दाखवले आहे. एमपीएससी परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर धुणी-भांडी करणाऱ्या आईची लेक आता अधिकारी बनली आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच महाविद्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या पाहून आपणही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली पाहिजे, असे कल्याणीला वाटायचे. त्यातूनच, मनाशी खुणगाट बांधत तिने प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं. एमपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली अन् पहिल्या प्रयत्नातच कल्याणीने यश मिळवले. कल्याणी थेट सहाय्यक अभियंता श्रेणी १ या पदावर जाऊन पोहोचली आहे.
संगमनेर शहरातील अत्यंत गोरगरीब नागरिकांचा परिसर असणाऱ्या संजय गांधी नगर परिसरात संगीता अहिरे या आपल्या दोन मुलांसह छोट्याशा घरात राहतात. कल्याणी व नवनाथ ही दोन्ही मुले लहानपणापासूनच हुशार होती. मात्र, आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आई संगिता यांना दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करायला जावे लागत. मात्र, आईने कष्ट करुन दोन्ही मुलांना शिक्षणाचे धडे दिले. याचवेळी आपल्या आईचे होणाऱ्या हाल पाहून कल्याणीही जिद्दीला पेटली होती. बारावीनतर तिने अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांच्या महाविद्यालयात अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या शासकीय गाड्या येत होत्या. त्यावेळी, आपण देखील एक दिवस या शासकीय अधिकाऱ्यांसारखे प्रशासनातील अधिकारी बनून शासकीय गाड्यांमध्ये येऊ, अशी प्रतिज्ञा तिने मनाशी केली.
त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही सुरू केली. घरी कायम अठरा विश्व दारिद्र्य होते, त्यात आई दुसऱ्याच्या घरी धुणं भांडीचे काम करत असल्याने पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहणे आणि शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कल्याणीने घरीच राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात नावलौकीक कामगिरी केली.
दरम्यान, सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देऊन कल्याणी उत्तीर्ण झाली. या परीक्षेचा निकाल कानी पडताच तिच्या आईला खूप आनंद झाला तर भावाचा आनंद गगनात मावेना. लेकीनं करुन दाखवलं, कष्टाचं चीज झालं, अशी भावना आईने यावेळी व्यक्त केली आहे.
House Maid Women Girl MPSC Success Story
Sangamner Kalyani Ahire