नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे याबद्दल पोलीस प्रशासन आणि सरकारकडून चिंता व्यक्त होत आहे. या अत्याचारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ‘डिजिटल रेप’ प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी २१ जानेवारी २०१९ रोजी नोएडा सेक्टर ३९ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सालारपूर गावातील साडेतीन वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेपप्रकरणी सूरजपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मंगळवारी ६५ वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा हा निर्णय देशातील डिजिटल रेप प्रकरणात पहिली शिक्षा असल्याचे म्हटले जात आहे.
डिजिटल रेप या गुन्ह्याविषयी अधिक माहिती देताना तज्ज्ञ वकीलांनी सांगितले की, डिजिटल रेप हा डिजिटल पद्धतीने केलेल्या कोणत्याही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नाही. जसे की इंटरनेटवर किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून एखाद्याची प्रतिमा खराब करणे. तसेच एखाद्याच्या परवानगीशिवाय त्या व्यक्तीच्या खासगी भागामध्ये बळजबरीने हाताची वा पायाची बोटे घालण्याची कृती होय. इंग्रजीत ‘डिजिट’ या शब्दाचा अर्थ पायाचे बोट, बोट आणि अंगठा असा होतो. म्हणून संमतीशिवाय ‘डिजिट’ जबरदस्तीने घुसवण्याला ‘डिजिटल रेप’ म्हणून वर्गीकृत केले जाते. पूर्वी अशी कृत्ये विनयभंग मानली जात होती. मात्र आता लैंगिक शोषण करण्यासाठी अंगठा किंवा हाता-पायाची बोटे वापरल्यास अथवा एखादी वस्तू वापरल्यास हा गुन्हा डिजिटल रेप म्हणून नोंदवला जातो.
या गुन्ह्यातील अकबर अली असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील गावचा रहिवासी आहे. २०१९ मध्ये अली आपल्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी नोएडा सेक्टर ४५ मधील सालारपूल गावात आला होता. त्यादरम्यान त्याने शेजारच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावले आणि घरातच त्याने मुलीवर डिजिटल रेप केला.
वकीलाने सांगितले की भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार डिजिटल रेप प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये शिक्षा १० वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. तसेच पॉक्सो आणि डिजिटल रेप प्रकरणात मुलगा किंवा मुलगी दोन्हीही पीडित असू शकतात. रेप म्हणजेच बलात्कार या गुन्ह्यात बहुतांश महिला किंवा मुली बळीत ठरतात.
असा प्रकार काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घडली होती. एका ८१ वर्षीय स्केच आर्टिस्ट, मॉरिस रायडर याच्यावर विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली होती. या व्यक्तीवर १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याशिवाय दिल्लीत एका ६० वर्षीय महिलेवर एका ऑटोरिक्षा चालकाने डिजिटल बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ६० वर्षीय महिला एका नातेवाईकाच्या घरी ऑटोमधून लग्न समारंभासाठी जात होती. दरम्यान ऑटोचालकाने महिलेच्या खाजगी भागामध्ये लोखंडी रॉड घातला होता. या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली.
त्याचप्रमाणे एका २ वर्षीय मुलीला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांना तिच्या खाजगी भागामध्ये बोटांचे ठसे आढळून आले. मात्र तेव्हा लैंगिक छळ किंवा बलात्काराची कोणतीही तक्रार आढळली नाही. त्यावेळी तपासात असे निष्पन्न झाले की तिचे वडीलच तिच्यासोबत दुष्कृत्य करायचे. त्यानंतर वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
Crime Digital Rape Court Order Conviction
Legal Sexual Assaults Girl Women