मुंबई – इंधनाचे म्हणजेच पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना समोर वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. सहाजिकच गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. परंतु ज्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेलची वाहने आहेत, त्यांनाही इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाटत आहे. परंतु आता आपल्या पेट्रोल दुचाकीचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करणे शक्य होणार आहे.
भारतीय दुचाकी बाजारपेठेत सर्वात जास्त मायलेज असलेल्या मोटरसायकलची म्हणजे हिरो स्प्लेंडर होय, असे म्हटले जाते. या बाईकची किंमत आणि देखभाल खर्च इतका कमी आहे की, तो सामान्य माणसाच्या बजेटमध्ये बसतो. पण सध्या गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोलची किंमत इतकी वाढली आहे, पण तुमच्याकडे हिरो होंडा स्प्लेंडर असल्यास एक किट लावल्यास वाहनाची पेट्रोल पासून सुटका करून घेता येईल.
भारतात सध्या इलेक्ट्रिक कार आणि बाईक्सची मागणी आणि विक्री वाढत आहे. यामुळे, अनेक वाहन उत्पादक तसेच नवीन स्टार्टअप या विभागात सहभागी झाले आहेत. यात काही स्टार्टअप्स आहेत, जे पारंपारिक इंधनावर चालणारी वाहने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी रूपांतरण किट देत आहेत. या किटचा वापर करून, तुम्ही तुमची जुनी कार किंवा बाईक इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलू शकता.
भारतीय स्टार्टअप मधील GoGoA1 या कंपनीने भारतात अतिशय लोकप्रिय बाईक हिरो स्प्लेंडरसाठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तयार केली आहे. सदर स्टार्टअप महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आहे. जर ग्राहक नवीन हिरो स्प्लेंडर घेणार आहेत किंवा जुनी स्प्लेंडर बाईक घेणार आहेत तसेच त्यांना पेट्रोलचा खर्च टाळायचा आहे, त्यांच्याकडे आता त्यांच्या बाईकमध्ये इलेक्ट्रिक किट बसवून पैसे वाचवण्याचा पर्याय आहे. या इलेक्ट्रिक किटच्या वापराला आरटीओने मान्यताही दिली आहे.
या EV रूपांतरण किटमध्ये मोटर आणि बॅटरी पॅकचा समावेश आहे. हे वेगवेगळ्या किंमतीत लाँच केले गेले आहेत. आरटीओने मंजूर केलेल्या 17 इंच 2000W ब्रशलेस हब मोटारची किंमत 35 हजार रुपये आहे. तसेच 72V 40ah क्षमतेच्या बॅटरी पॅकची किंमत 50 हजार रुपये आहे, जी तुम्हाला स्वतंत्रपणे खरेदी करावी लागेल. तथापि, बाईकमध्ये इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट बसवण्याचा खर्च अधिक असेल.
तसेच तुम्हाला 72V 10amp चार्जर देखील खरेदी करावा लागेल, ज्याची किंमत 15,606 रुपये असेल. यावर 18 टक्के जीएसटी देखील भरावा लागेल, जो एकूण 16,309 रुपये आहे. अशा प्रकारे, तुम्हाला संपूर्ण किटसाठी एकूण 1,06,915 रुपये द्यावे लागतील. ग्राहक कंपनीच्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन बुक करू शकतात.
हिरो स्प्लेंडर बाईकला इलेक्ट्रिक किटसह खूप खर्च येईल. तथापि, हे एक वेळच्या गुंतवणुकी नंतर बाईक चालवण्याचा खर्च कमी होईल. या इलेक्ट्रिक किटसह 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. तसेच GoGoA1 ने दावा केला आहे की एकदा ही इलेक्ट्रिक किट बसवल्यानंतर बॅटरी पूर्ण चार्ज झाली की हिरो स्प्लेंडर बाईक 151 किमी पर्यंतचे अंतर कापू शकेल.
सध्याच्या काळात, प्रमुख वाहन उत्पादकांनी त्यांच्या लोकप्रिय बाईकच्या इलेक्ट्रिक आवृत्त्या अद्याप लाँच केल्या नाहीत. अनेक इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात विकल्या जात आहेत. या बाईकमध्ये अनेक स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहेत, राज्यांकडून सबसिडी दिल्यानंतर त्याची किंमत बरीच कमी होते. याशिवाय, हिरो, बजाज आणि यामाहा, होंडासह अनेक कंपन्या येत्या काळात त्यांच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करतील.