पाटणा – एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे मानून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तीच व्यक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहिली तर तुमची दातखिळी बसल्याशिवाय राहणार नाही. अशी एक घटना बिहारमधील पाटणा येथे घडली आहे. नातेवाईकांनी ज्या युवतीला मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले, ती प्रेमी युवकासोबत फेसबुक लाइव्ह करताना दिसली. या घटनेनंतर तिच्या कुटुबींयांसह पोलिससुद्धा हैराण झाले आहेत. युवती जिवंत असेल तर अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोणाचा होता, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
हे प्रकरण पाटणा येथील गौरीचक पोलिस ठाणे हद्दीतील आहे. येथील एक मुलगी बेपत्ता झाली होती. काही दिवसांपूर्वी एका युवतीचा मृतदेह आढळला. माहिती कळताच युवतीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. ती आपलीच मुलगी असल्याची त्यांनी ओळख पटविली. त्याही पुढे त्यांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर १२ जुलैला ती युवती प्रेमी युवकासोबत फेसबुकवर लाइव्ह आली. आपल्या पोस्टला तिने फेसबुकवरील मित्रांना शेअरही केली. फेसबुकवर मुलीने लाइव्ह केल्याची माहिती मिळाल्यानंतर युवतीची आई थेट पोलिस ठाण्यात पोहोचली आणि प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. आता गौरीचक पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रकरणाचा तपास करत आहेत.
खून आणि बलात्काराचा होता गुन्हा
युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस याच मुद्यावरून तपास करत आहेत. परंतु ज्या मुलीला सर्व लोक मृत समजत होते, ती जिवंत होती. त्यामुळे तो मृतदेह नेमका कोणाचा होता याचा तपास सुरू आहे. मुलीचा अंत्यसंस्कार केल्यामुळे तपासात अडचण येण्याची शक्यता आहे.
डीएनए चाचणीनंतरच ओळख पटविणे शक्य
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करवून घेतले होते. फोटोद्वारे कोणी तिची ओळख पटविण्यास आल्यास डीएनए चाचणीच्या आधारे ओळख पटविण्यास मदत मिळू शकते. सुरुवातीला मृतदेह आढळल्यानंतर त्याला अज्ञात मानून पोलिस मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होते. परंतु त्याच वेळी कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिची ओळख पटल्याचा दावा केला. त्यावेळी मृतदेह व्यवस्थित पाहून मगच ओळख पटवावी, असे पोलिसांनी सांगितले होते. परंतु नातेवाईकांनी घाईगडबडीत आपलीच मुलगी असल्याचा दावा केला होता.