मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुडत्याचे पाय खोलात या म्हणीची प्रचिती देणारी परिस्थिती सध्या अदानी उद्योग समूहाच्या बाबतीत अनुभवायला मिळत आहे. एकीकडे हिंडेनबर्गने जगभर बदनामी केल्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर एफपीओ गुंडाळल्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास गमावण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच एसबीआयने अदानींवर २१ हजार कोटींचं कर्ज असल्याचं म्हटलं आहे. एवढ्या गोष्टी अदानींसाठी डोकेदुखी ठरत असतानाच आता फोर्ब्सने देखील अदानींचा एफपीओ संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं म्हटलं आहे.
हिंडेनबर्गने कथित आर्थिक गैरव्यवहारात अदानी उद्योग समूहाचा उल्लेख केल्यानंतर आता फोर्ब्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात अदानींच्या ३२० हजार कोटी रुपयांच्या एफपीओबाबत मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. फोर्ब्सने दिलेल्या अहवालानुसार, लंडन येथील इन्व्हेस्टमेंट फर्म एलारा कॅपिटलची सहायक कंपनी प्रायव्हेट लिमीटेड आणि एक भारतीय ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थद्वारे विक्रीच्या प्रस्तावांच्या करारातील १० अंडरराईटर्समधील दोन कंपन्या होत्या. अदानींनी कोणत्या व्यक्तिगत फंडाला २.५ अब्ज डॉलर्सचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या मदतीसाठी कामी लावले होते, हा असा प्रश्न उपस्थित होत आहे. एलारा कॅपिटल आणि मोनार्क नेटवर्थ यांच्या भागिदारीमुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सिटीग्रुपचे एक जुने गुंतवणुकदार बँकर आणि ऑस्ट्रेलिया येथील क्लायमेट एनर्जी फायनान्सचे संचालक टीम बकल यांनी अदानी उद्योग समूहातील अंतर्गत लोकांनीच हा गोंधळ घातल्याचा दावा केला आहे. अदानी, एलारा आणि मोनार्क यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही, असंही फोर्ब्सने म्हटलं आहे.
हिंडेनबर्गचा अहवाल काय म्हणतो?
हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी कंपनीवर शेअर मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. २४ जानेवारीला हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. हिंडेनबर्गने अदानींवर हेराफेरी आणि अकाऊंटमध्ये फ्रॉड केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर अदानींचे मोठे नुकसान झाले आणि पुढे त्यांनी एफपीओदेखील गुंडाळला.
Gautam Adani Group After Hindenburg Forbes Report
Finance Industry FPO