जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कौटुबिंक न्यायालयाचा सहाय्यक अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर हा अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. कौटुबिंक न्यायालयात खावटीची एकरकमी रक्कम जमा करणेकरीता तारीख वाढवून देण्यासंदर्भात लाचखोर बडगुजरने २०० रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,, तक्रारदार व त्यांची पत्नी यांच्यामध्ये कौटुबिंक वाद होते. त्यामुळे तक्रारदार यांनी पत्नी विरुद्ध जळगाव येथील कौटुबिंक न्यायालयात पत्नीने त्यांच्याकडे नांदावयास यावे म्हणून दावा दाखल केला आहे व पत्नीने देखील तक्रारदार यांचे विरुद्ध त्याच कौटुबिंक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. सदर दाव्यात कौटुबिंक न्यायलयाने तक्रारदार यांना ८५,००० रुपये एकरकमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिला. सदर खावटीची एकरकमी रक्कम जमा करणेकरीता तारीख वाढवून मिळावी, अशी मागणी पतीने केली. त्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष बडगुजर याने २०० रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम बी. जे.मार्केट येथील कौटुबिंक न्यायालयाच्या वरच्या माळ्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ स्विकारली. त्यावेळी त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalgaon Family Court ACB Raid Trap Corruption