नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायगड जिल्ह्यातील उरणमधील बोकडवीरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विद्युत निर्मिती केंद्रात बॉयलरच्या पंपाचा भीषण स्फोट झाल्याने एका ज्युनियर इंजिनियरसह दोन कामगार गंभीररित्या भाजले आहेत. प्राथमिक उपचारा नंतर त्यांना अधिक उपचारासाठी नवीमुंबईत नेण्यात आले आहे. उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. रविवार असल्याने कामगारांची विशेष वर्दळ नसली तरी वायू विद्युत निर्मिती संच सुरु असल्याने काही मोजके कामगार कामावर हजर होते.दुपारी १२ ते च्या १२.३० च्या सुमारास कंपनीच्या बॉयलर विभागात काम सुरु असतना बॉयलर मधील दाब अचानकपणे वाढला. त्यामुळे बॉयलरला जोडलेला बीसीसी पंप सदरचा दाब सहन न करू शकल्याने या पंपाचा जबरदस्त स्फोट झाला. सदरच्या बॉयलरचे दर २५ वर्षांनी सर्वेक्षण करणे आवश्यक असताना संबधीत खात्याकडून तपासणी करून दाखला घेतला गेला नव्हता अशी माहिती समोर आली आहे.
या ठिकाणी काम करीत असलेले जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे, टेक्निशियन कुंदन पाटील (रा.उरण डोंगरी), विष्णू पाटील (रा.बोकडवीरा) हे या झालेल्या स्फ़ोटात जबर भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी इंदिरागांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता प्राथमिक उपचारा नंतर त्याना अधिक उपचारासाठी दोघांना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात तर एकाला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जुनियर इंजिनियर विवेक धुमाळे यांचा मृत्यू झाला आहे. या स्फ़ोटा बाबत अधिक तपास सुरु आहे.