इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दूध आरोग्यपूर्ण मानले जाते, विशेषतः लहान मुलांसाठी दूध हे पूर्णान्न समजले जाते, परंतु आजच्या काळात दुधाऐवजी दूध पावडर लहान मुलांना दिली जात आहे. परंतु ही दूध पावडर बाळांच्या आरोग्याला खरंच पोषक आहे की घातक? याचा विचार करणे आवश्यक बनले आहे. कारण पंजाबमधील पतियाळामध्ये मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे.
पतियाळा येथे मुलांसाठीची खराब झालेली (एक्सपायर) दुधाची पावडर नवीन पॅकिंगमध्ये टाकून तयार केली जात होती. आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ही बाब उघडकीस आणली. आपण जर मुलांना डब्बा (कॅन) मधील किंवा पॅकींग मधील दूध पावडर देत असाल तर काळजी घ्या..
पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने या कारखान्याचे व्यवस्थापक आणि येथे काम करणाऱ्या एका महिलेची चौकशी केली आहे. या प्रकरणाची आणखी चौकशी करण्यात येत आहे. येथील सुमारे एक लाख कॅन जप्त करण्यात आली आहेत ज्यांची वापराची तारीख संपली आहे.
पतियाळा येथील औद्योगिक परिसरात आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत मुलांच्या पावडर दुधाचे पॅकिंग करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. विभागाच्या पथकांनी एक्सपायरी डेट जवळ असलेल्या एक लाख दुधाच्या पेट्या जप्त केल्या. विविध प्रकारची औषधेही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली.
या संदर्भात सहाय्यक सिव्हिल सर्जन डॉ. विकास गोयल यांनी सांगितले की, एका स्वयंसेवी गैरसरकारी संस्थेने संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलिस प्रशासनासह डॉ.शैली जेटली यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकांनी पतियाळा औद्योगिक परिसरात लहान मुलांसाठी दूध पावडर पॅकिंग करणाऱ्या या कारखान्यावर छापा टाकला.
या घटनास्थळावरून एक्स्पायरी डेट असलेल्या दुधाच्या पावडरच्या कार्टन्सचा मोठा साठा जप्त केल्याने छापा टाकणाऱ्या पथकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. नवीन पॅकिंगमध्ये या पावडरी टाकल्या जात असून, ते थेट मुलांच्या जीवाशी खेळत होते. यासोबतच कालबाह्य औषधांचाही मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पॅरासिटामॉल, मल्टी-व्हिटॅमिन आणि इतर औषधे समाविष्ट आहेत.
या सर्वांचा ताबा सदर विभागाने घेतला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी कारखान्याचा व्यवस्थापक आणि तेथे काम करणाऱ्या एका महिलेची चौकशी केली. कारखानदार सध्या दिल्लीत असल्याबाबत व्यवस्थापक बोलत आहेत. दुधाचे नमुनेही घेण्यात आले असून, त्यामुळे ते बनावट आहे की नाही, याचाही शोध घेता येईल, असे डॉ. गोयल यांनी सांगितले. चौकशीअंती कारखाना मालकावरही कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.