इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या पाच वर्षात देशातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, विशेषतः खून, बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारखे काही विकृत गैरप्रकार प्रचंड वाढलेले दिसून येतात. त्यातच लहान मुलावरील मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याने सामाजिक संघटनांकडून मोठी चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अत्याचाराच्या घटना काही वेळा जवळच्या नातेवाईकांकडून करण्यात येतात. मुंबई, दिल्ली, कोलकाता, कानपुर, भोपाळ या सारख्या मेट्रो शहरात गुन्हेगारी आणि लैंगिक अत्याचारांमध्ये गेल्या वर्षभरात वाढ झालेली आहे. नुकतीच दिल्लीतील जनकपुरी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अत्यंत अमानुष प्रकार म्हणजे यातील आरोपी हा पीडितेचा सावत्र बाप आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईच्या माहितीवरून पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी जनकपुरी येथे कुटुंबासोबत राहते. कुटुंबात आई आणि भावाशिवाय सावत्र वडील आहेत. तर मुलीने आपल्या जबानीत सांगितले की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिचे सावत्र वडील आणि आईचे भांडण झाले, त्यानंतर आई घरातून निघून गेली. यावेळी पीडित मुलगी आणि तिचा भाऊ सावत्र वडिलांसोबत राहत होते. एका रात्री तिच्या सावत्र बापाने खोलीत तिच्यावर बलात्कार केला. तसेच कुणाला सांगितल्यास भावंडांना घराबाहेर हाकलून देण्याची धमकी आरोपीने दिली.
त्यानंतर आरोपीने वारंवार बलात्काराचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. नुकतीच अल्पवयीन मुलीची आई तिला आणि तिच्या भावाला सोबत घेण्यासाठी आली असता, मुलीने आपली दुर्देवी व्यथा कथन केली. यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना माहिती दिली. यावरून जनकपुरी पोलीस ठाण्यात १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला तिच्या घरातून अटक केली. सध्या आरोपीला कारागृहात पाठवले आहे.