नवी दिल्ली – तिहार तुरुंगात बसून २०० कोटींची वसुली करणारा मोठा भामटा सुकेश चंद्रशेखर याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात चंद्रशेखर बाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की, अभिनेता सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ५२ लाखांचा घोडा आणि ९ लाख किमतीची एक पर्शियन मांजर भेट दिली होती. इतकेच नाही तर नोरा फतेही हिला सुद्धा कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच चंद्रशेखरने तिहार तुरुंगात बंद असतानाही एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून तब्बल २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामीन मिळाल्यानंतर चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिससाठी मुंबई ते दिल्ली आणि दुसरे दिल्ली ते चेन्नई असे चार्टर्ड फ्लाइट बुक केले. तसेच आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, दोघेही चेन्नईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तसेच जामिनावर बाहेर असताना चंद्रशेखरने चार्टर्ड फ्लाइटने विमान प्रवासासाठी ८ कोटी रुपये खर्च केले. चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या नातेवाईकांनाही मोठी रक्कम पाठवली होती, असेही ईडीने न्यायालयाला सांगितले. दरम्यान, चंद्रशेखरने नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्याची एकूण किंमत एक कोटी रुपये आहे.