दिंडोरी – दिंडोरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यात शिवसेनेच्या मेघा नितीन धिंदळे यांनी तर भाजपच्या आशा भास्कर कराटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्याने भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र पक्ष श्रेष्ठींच्या आदेशान्वये भाजपने अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केल्याचे सांगितले असून भाजप च्या भूमिकेने राजकीय रंगत वाढली आहे
नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सहा राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच भाजपचे चार व काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. कुणालाच बहुमत न मिळाल्याने कोण कुणासोबत जाणार याची उत्कंठा लागली असताना शिवसेना व काँग्रेसने राष्ट्रवादी ला सोबत घेतल्याने महाविकास आघाडीची सत्ता येणार त्यातच भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केल्याने बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त होत होती. मात्र भाजपने उमेदवार दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. पहिल्या अडीच वर्षाकरता नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मुदतीत दोन अर्ज दाखल झाल्याची माहिती दिंडोरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दिनांक १४ फेब्रुवारी असून १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न होणार आहे. तत्पूर्वी १५ फेब्रुवारी ला सकाळी ९ ते ११ पर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीत उपनगराध्यक्ष कुणाला दिले जाणार भाजपची काय रणनीती असणार याची उत्कंठा वाढू लागली आहे.
भाजप विरोधकाची भूमिका पार पाडेल
दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत दिंडोरी शहरातील जनमताचा आदर राखत भाजपने तटस्थ भूमिका घेतली. मात्र काही प्रवृत्तींनी राजकारण करत भाजपचे चारही नगरसेवक एकत्र नसल्याचे खोटे चित्र निर्माण करत जनतेच्या मनात संभ्रम तयार केला. त्यामुळे भाजपाचे चारही नगरसेवक एकजूट आहेत व एकत्रितपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेत सक्षमपणे संघटीत आहेत हे जनतेपुढे सिद्ध करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरत आहोत. भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक एकत्रितपणे पक्षाच्या ऊमेदवारास मतदान करुन आपण एकजूट असल्याचा संदेश याद्वारे जनतेत देणार आहोत. भारतीय जनता पार्टी जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी पणे विरोधकाची भुमिका पार पाडेल हे या निमित्ताने आम्ही चारही नगरसेवक आश्वासित करतो.
सौ. अरुणा रणजित देशमुख
गटनेता, भारतीय जनता पार्टी, दिंडोरी