अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यामुळे
मनपाच्या बजेटमध्ये फुले दाम्पत्याच्या पुर्णाकृती पुतळ्याची तरतूद
नाशिक – नाशिक शहरात महापुरुषांची स्मारके उभारणीसाठी नाशिक महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतूद केली आहे. यामध्ये मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळ्यासोबतच शहरात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,महाराणा प्रताप आणि साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. नाशिककरांच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब असून नाशिक मनपाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्याची दखल घेतल्याबद्दल समता परिषदेचे सरचिटणीस आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी,मनपा आयुक्त कैलास जाधव व स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे आभार मानले आहे.
समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, महापुरुषांची स्मारके उभारणीसाठी नाशिक महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतूद केली आहे. यामध्ये नाशिक पूर्व विभागात मुंबई नाका येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळ्या सोबतच नाशिक पश्चिम विभागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राजमाता जिजाऊ व बी.डी.भालेकर हायस्कूल जवळ साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा,पंचवटी विभागात महाराणा प्रताप यांचा पुतळा व पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉझ धातुचा पुर्णाकृती पुतळा उभारणेची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाशिक शहरात कुठेही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुर्णाकृती पुतळे नसल्याने मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत होता.या पाठपुराव्याला यश मिळाले असून या महापुरुषांचे स्मारक उभारण्यासाठी नाशिक मनपाच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, शहरात महापुरुषांचे स्मारके उभी राहिल्याने शहराच्या सोंदर्यात व नावलौकिकात अधिक भर पडणार आहे. तसेच या स्मारकामुळे महापुरुषांचे विचार जोपासण्यास अधिक मदत होणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात महापुरुषांच्या स्मारकांसाठी विशेष तरतूद केल्याबद्दल आपण मनपा आयुक्त, महापौर व स्थायी समिती सभापतींचे आभार मानतो असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.