इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणाऱ्या गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळेच गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांना तुफान गर्दी होत आहे. असे असले तरी तिचा डान्स हा बऱ्यापैकी अश्लील असल्याने तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. राष्ट्र विकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीवर गौतमी पाटीलने स्वतःच आपली भूमिका मांडली आहे.
आपल्या नृत्यावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. सांगली येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेने केली आहे. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे गौतमीवर कारवाईची मागणी केली आहे.
आपले म्हणणे मांडताना गौतमी म्हणते, “ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळं मी आज इथे आहे. मी एक कलाकार आहे. माझा कार्यक्रम पाहण्यासाठी फक्त पुरुष नाही तर महिला देखील येतात. सर्व प्रकारचे प्रेक्षक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. त्यांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होते असं गौतमी म्हणाली.
सांगलीचा प्रकार गर्दीमुळे घडला. माझ्या कार्यक्रमाला किती गर्दी होते याचा अंदाज मी नाही लावू शकत. मी स्टेजवर नाचत असते. त्यामुळे स्टेज खाली काय घडतयं हे मला कसं कळणार. यामुळे सांगलीच्या प्रकाराबद्दल मी काय बोलणार. माझ्या कार्यक्रमांना इतकी गर्दी होते की अनेकदा मला पोलिसांच्या गाडीतून कार्यक्रम ठिकाणावरून बाहेर पडावे लागते.
गौतमी पाटीलचे भविष्यातील प्लॅन काय, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सध्या मला गाण्यांसाठी विचारणा होते आहे. माझा चित्रपटही येत आहे. आणखी चित्रपट आणि गाणी आली तर मी नक्कीच करेन. माझे कार्यक्रमही होतच राहतील. ते मी बंद करणार नाही, असे ती सांगते.
लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभाव व भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात गौतमीचा डान्स बघायला आलेल्या प्रेक्षकाचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा असी मागणी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती.
Dancer Gautami Patil on Lavani Program Ban