नाशिक – हेल्मेट वापरासंबंधीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांच्या भरारी पथकाने पोलिसांनी सातपूरच्या आयटीआय तसेच पिनॅकल मॉलच्या मालमत्ता अधिकारी (इस्टेट ऑफिसर) विरुद्ध कारवाई केली आहे. सातपूरमधील ‘आयटीआय’ अर्थात औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात विद्यार्थी व कर्मचारी विना हेल्मेट प्रवेश करताना आढळून आले. त्यामुळे संस्थेच्या मालमत्ता अधिकाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३१ (ब) (१) अन्वये कारवाई करण्यात आली. तर त्र्यंबक नाका परिसरातील पिनॅकल मॉलमध्ये येणारे ग्राहक तसेच कर्मचारी विना हेल्मेट प्रवेश करताना आढळून आल्याने मॉलचे मालमत्ता अधिकारी अर्थात व्यवस्थापक सचिन वसंत टर्ले यांच्याविरुद्धही महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३१ (ब) (१) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
हेल्मेट वापरासंबंधी प्रबोधन, समुपदेशन आदी उपाय राबवल्यानंतर अशा प्रकारे मालमत्ता अधिकाऱ्याविरुद्ध झालेली ही पहिलीच कारवाई आहे. ‘नो हेल्मेट-नो कॉपरेशन’ या मोहिमेतंर्गत शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, पार्किंग स्थळ, औद्योगिक वसाहत, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये आदी ठिकाणी मालमत्ता अधिकाऱ्यांवर दुचाकीस्वारांच्या हेल्मेट वापराविषयाची जबाबदारी निश्चित केली होती. त्यानुसार प्रथमच कारवाई करण्यात आली आहे.