नाशिक – संत ज्ञानेश्वर नगर परिसरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यास अटक करण्यात आली असून दहा हजारांचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब खंडेराव राहींज (वय ४०, रा. संत ज्ञानेश्वर नगर, जेलरोड) असे त्या पतंग विक्रेत्याचे नाव आहे. राहींज हा नॉयलॉन मांज्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनचे वरीष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार शंकर काळे, देवकिसन गायकर, सुगन साबरे, प्रकाश बोडके, यादव डंबाळे, सुनील आहेर, गौरव गवळी यांनी छापा टाकून या पतंग विक्रेत्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा हजार रुपये किंमतीचे हिरो प्लस व मोनोकाईट कंपनीचे दहा हजार रुपये किंमतीचे २० रोल हस्तगत करण्यात आले आहे. त्यास नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.