पंचवटी – पंचवटीतील हिरावाडी रोडवर परिसरात असलेल्या दामोदर नगर समोरील महापालिकेच्या उद्यानाजवळ मोकळया पटांगणात बुधवारी (ता.५) दुपारी सापडलेल्या मृतदेहाची २४ तासात उकल करण्यास पंचवटी पोलिसांना यश मिळाले आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून सुनिल त्रंबक कराटे (३५) याचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याचे उघड झाले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरीत दोघांची चौकशी सुरु आहे.
दाद्या उर्फ गटल्या राजाराम वाघ (वय २६, हिरावाडी) व किरण भिका खरात (वय २५, वाघाडी) अशी संशयितांची नावे आहेत. दाद्या व मयत सुनील दोघेही रंगकाम करायचे. तर किरण हा वॉचमन आहे. तिघेही एकत्र दारु पिले. त्यानंतर अजून दारु पिण्यासाठी सुनीलकडे असलेल्या दोन हजार रुपयांपैकी काही पैसे देण्याची मागणी करण्यात आली. परंतू सुनीलने नकार दिल्याच्या रागातून दाद्या व किरण यांनी सुनीलच्या डोक्यात दगड टाकला. तो निपचित पडल्याचे पाहून दोघांनी काढता पाय घेतला.