नाशिक : प्रेमप्रकरणास नकार देवूनही तरूणीचा पाठलाग करणा-या संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे. अश्लिल शिवीगाळ करीत संशयीताने अॅसिड टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बळवंत नारायण ससाणे (२१ रा.विजयनगर,देवळाली कॅम्प) असे संशयीताचे नाव आहे. १९ वर्षीय पिडीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या १५ ऑगष्ट पासून संशयीत पीडितेवर पाळत ठेवत असून त्याने तरूणीचा फोन नंबर मिळवित सलगी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जाणा-या तरूणीस गाठून त्याने प्रेमसंबध ठेवण्याची मागणी केली होती. मात्र तरूणीने त्यास चांगलेच सुनावले होते. तरीही तो तिच्या घराबाहेर घुटमळत असे तसेच घराबाहेर पडतांना आणि कामाच्या ठिकाणी जातांना येतांना तो पाठलाग करीत असे नुकतेच त्याने तरूणीस शिवीगाळ करीत अंगावर अॅसीड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. संशयीतास पोलीसांनी ताब्यात घेत कोर्टाने हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.