नाशिक : क्रिकेट खेळत असतांना तिघा अल्पवयीन मुलांनी एकास स्टम्पने बेदम मारहाण केल्याची घटना विनयनगर भागात घडली. या घटनेत २० वर्षीय तरूणाच्या नाकास मोठी दुखापत झाली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या विधी संवर्धीत मुलांची बालन्यायालयाच्या आदेशाने मनमाड येथील बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. मौसिन मोबिन शेख (२० रा.मराठी शाळे मागे भारतनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मौसिन शेख शुक्रवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास विनयनगर येथील गणपती मंदिर गार्डन येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळत असतांना अल्पवयीन तीन मुलांनी त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने लाकडी स्टम्पने मारहाण केल्याने मौसिन जखमी झाला असून त्याच्या नाकास मोठी दुखापत झाली आहे. हा गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तिघा विधी संवर्धीत बालकांना ताब्यात घेतले असता न्यायालयाने त्यांची बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.