नवी दिल्ली – कोरोना विषाणूची उत्पत्ती झाल्यानंतर जगभरात एकच हाहाकार उडाला होता. गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्वच देश या विषाणूशी लढा देत आहेत. त्याला रोखण्यासाठी लशीवर संशोधन करून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात या विषाणूने अनेक रूपे बदलली असून कमी-अधिक प्रमाणात घातक ठरली आहेत. नुकतेच आढळलेले कोरोनाचे ओमिक्रॉन हे रूप कमी घातक असल्याचे निदर्शनास आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटहून कमी घातक आहे. ओमिक्रॉन कमी घातक असेल तर याला कोरोना महामारीचा अंत होण्याची सुरुवात असल्याचे मानले जाऊ शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ३३ रुग्ण आढळले आहेत. परंतु या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत २६ जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान एका दीड वर्षाच्या मुलीने ओमिक्रॉनवर मात केली आहे. ओमिक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत चार ते पाच पटीने वेगाने फैलावतो, परंतु रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाहीय. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अनेक अधिकारी कोरोना महामारीचा अंत असल्याचे मानत आहेत.
देशातील नागरिक मास्कचा कमी वापर करत असल्याबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढू शकतो. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. ओमिक्रॉनमुळे आरोग्य व्यवस्थेवर कोणताही भार पडणार नाही. या विषाणूला येथेच रोखण्याची गरज आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.