नाशिक – कसारा बसवर दगडफेक; काच फुटून नुकसान
नाशिक : धावत्या बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना महामार्गावरील उड्डाणपूलावर घडली. या घटनेत एसटीची पुढील काच फुटून नुकसान झाले असून चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष डेविड धांडे (५४ रा.इगतपुरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धांडे शनिवारी (दि.११)सकाळच्या सुमारास नाशिक कसारा या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. एमएच ४० वाय ५९७३ या बसमध्ये प्रवासी भरून ते कसाराच्या दिशेने रवाना झाले असता उड्डाणपूलावर ही घटना घडली. मामा का ढाबा समोरून बस जात असतांना उड्डाण पुलावरील दुभाजकांमध्ये लावलेल्या शो च्या झाडामधून अज्ञात समाजकंटकाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसची पुढील काच फुटून सुमारे पाच हजार रूपयांचे नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
क्लासरूममधून मोबाईलची चोरी
नाशिक : क्लासरूममध्ये चार्जींगला लावलेला मोबाईल साफसफाई करणा-या नोकराने चोरून नेल्याची घटना दिंडोरीनाका भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश सुखदेव गांगुर्डे (रा.पेठरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे दिंडोरी नाका येथील गुरूकृपा क्लासेस मध्ये काम बघतात.शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास त्यांनी आपला मोबाईल क्लासरूममध्ये चार्जींग साठी लावला असता ही घटना घडली. साफसफाई करण्यासाठी आलेल्या अज्ञात नोकराने तो चोरून नेला. अधिक तपास हवालदाार सोर करीत आहेत.