नाशिक : शतपावली करून घराकडे परणा-या महिलांपैकी एकीच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना जत्रा नांदूर लिंकरोड भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ प्रकाश साळुंखे (५६ रा.महालक्ष्मी टॉवर शेजारी,जत्रा नांदूर लिंकरोड) या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साळुंखे या शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी शेजारी राहणा-या महिलांसमवेत शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील सीपीएम इस्टेट भागात त्या फेरफटका मारून घराकडे परतत असतांना ही घटना घडली. सेंट पिटर स्कूल कडेजाणा-या मार्गाने महिला जात असतांना समोरून पल्सरवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे ६२ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत.