देवळाली गावात पार्क केलेली अॅटोरिक्षा समाजकंटकांनी पेटवून दिली
नाशिक : घरासमोर पार्क केलेली अॅटोरिक्षा अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना देवळाली गावातील सोमवार पेठेत घडली. या घटनेत रिक्षा जळून खाक झाली असून परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस समाजकंटकांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपक्रिया बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ अब्बास पटेल (रा.सोमवारपेठ,देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. पटेल यांनी शुक्रवारी (दि.१०) रात्री आपली अॅटोरिक्षा एमएच १५ एफयू ३१६९ घरासमोर पार्क केली असता ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास अज्ञातसमाजकंटकांनी नुकसान करण्याच्या हेतूने ती ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत रिक्षाचे कुशन आणि हुड जळून खाक झाले असून वेळीच ही घटना निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. रिक्षा जवळ अनेक वाहने पार्क केलेली होती. मात्र आगीची धग वेळीच विझविण्यात आल्याने अन्य वाहनांना धोका पोहचला नाही. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
वेगवेगळय़ा भागातून दोन मोटारसायकली चोरीला
नाशिक : शहरात पार्क केलेली वाहने दिवसा ढवळया चोरीस जात असून, धार्मिक स्थळाजवळ पार्क केलेली अॅटोरिक्षासह वेगवेगळय़ा भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका,पंचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिडकोतील राणाप्रताप चौकात राहणारे राजू शंकर तुपे यांची अॅटोरिक्षा एमएच १५ एफयू ०२०७ गुरूवारी (दि.९) रात्री वडाळागावातील यासिन मदरसा भागात पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत. दुसरी घटना पेठरोड भागात घडली. याप्रकरणी आफताब आलम खान (रा.भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. खान गेल्या मंगळवारी (दि.७) पेठरोड भागात कामानिमित्त गेले होते. व्यास ट्रॉन्सपोर्ट समोर त्यांनी आपली ज्युपिटर एमएच १५ एचई २९७३ दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत. तर निखील शिवलिंगप्पा पाथरकर (रा. राधे रेसि. राजीवनगर) यांची पल्सर एमएच१५ एफपी ०८६६ गेल्या बुधवारी (दि.८) त्यांच्या सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार हादगे करीत आहेत.