नाशिक : बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओवर सशस्त्र आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सुरक्षा रक्षक दांम्पत्यास धारदार कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकला. या घटनेत विरोध करणा-या वॉचमनला बेदम मारहाण करीत टोळक्याने पत्नीस जीवे मारण्याची धमकी देत तब्बल साडे आठ लाख रूपये किमतीचे ब्रांझ धातूचे पुतळयांवर डल्ला मारला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत. जयदेव किसन जाधव (रा.गर्गे स्टुडिओ) या सुरक्षा रक्षकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे.. बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओ या कारखान्यात जाधव दांम्पत्य सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. कारखाना प्रशासनाकडून दांम्पत्यासाठी तेथेच वास्तव्याची सुविधा करण्यात आली असून शुक्रवारी (दि.१०) ही घटना घडली. देवदेवतांसह थोर पुरूषांची वेगवेगळया धातू पासून मुर्ती व पुतळे बनविणा-या या कारखान्यात पहाटेच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने प्रवेश केला. याबाबत चाहूल लागताच जाधव दांम्पत्याने कारखान्यात धाव घेतली असता हीघटना घडली. सशस्त्र असलेल्या संतप्त टोळक्याने जाधव यांना लाथाबुक्यांनी व धारदार कोयत्याने बेदम मारहाण केली. तसेच पत्नीस कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने कारखान्यातील संत तुकारामांचे सुमारे साडे आठशे किलो वजनाचे धातूचे दोन पुतळे व शिवाजी महाराज यांची ब्रांझ धातूपासून बनविलेली १०० किलो वजनाची तलवार आणि सुमारे ४५० किलो वजनाचा पुतळा असा सुमारे ८ लाख ४० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या घटनेत जाधव जखमी झाले आहे. या घटनेची माहित मिळताच सातपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत टोळक्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नाही. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण करीत आहेत.