नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून मालट्रक सह दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी मुंबईनाका,सरकारवाडा व अंबड पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. चौकमंडईतील मिरान अब्दूल मजीद पठाण यांनी शनिवारी (दि.४) आपल्या ताब्यातील मालट्रक एमएच १५ एजी ८५२८ सारडा सर्कल परिसरातील हुड्डा कार डेकोरेट दुकानासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केला असता तो चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत. दुसरी घटना जिल्हारूग्णालय आवारात घडली. रविंद्र हिरामण महाले (रा.जातेगाव ता.त्र्यंबकेश्वर) हे गेल्या ८ सप्टेंबर रोजी आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी जिल्हा रूग्णालयात आले होते. रूग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १७ यू ८८९१ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक माळोदे करीत आहेत. तर रोहिदास रमेश नितनवरे (रा.वडाळा पाथर्डीरोड) यांची पॅशन प्लस दुचाकी गेल्या दि.१८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखे नजीक उड्डाण पुलाखाली पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.