बजरंगवाडीतील १९ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून केली आत्महत्या
नाशिक : बजरंगवाडीतील १९ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी तिच्या कडून चुकून विषारी औषध सेवन झाल्याचा दावा कुटूंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निशा कैलास साठे (रा.नासर्डी ब्रीज जवळ,बजरंगवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. निशा साठे या विवाहीतेने गुरूवारी (दि.१८) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मृत्यु झाला. दरम्यान निशाचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाल्याचे कळते. नजरचुकीतून तिच्या कडून विषारी औषध सेवन झाल्याचा दावा कुटूंबियांनी केला असून अधिक तपास पोलीस नाईक भोये करीत आहेत.
दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबडून नेल्याची घटना जयभवानी रोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा प्रदिप गावंडे (रा.दत्तमंदिर ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गावंडे या गुरूवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास मुलास घेण्यासाठी माहेरी विहीतगाव येथे जात असतांना ही घटना घडली. जयभवानी रोडने त्या विहीतगावच्या दिशेने अॅक्टीव्हावर प्रवास करीत असतांना आपले सरकार केंद्रासमोर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ५१ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.