नाशिक : जीवे मारण्याची धमकी देत डोंगरावर घेवून जात दोन अल्पवयीन मामे बहिणींवर वेळोवेळी बलात्कार करणा-या एकास विशेष पोस्को न्यायालयाचे न्या. डी.डी. देशमुख यांनी एकत्रीत दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना सन.२०१७ मध्ये मार्कड ऋषी डोंगरावर घडली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार अधिनीयम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शांताराम मोहन माळी (रा.मोहाळी ता.दिंडोरी)असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका पिडीतेच्या आईने तक्रार दाखल केली होती. संशयीताने २१ आॅगष्ट २०१७ रोजी अल्पवयीन पिडीतेच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत तिला दुचाकीवर चक्कर मारण्याचा बहाणा करून वणी नजीकच्या मार्कंण्ड ऋषी डोंगरावर घेवून जात जीवे ठार मारण्याचा धमकी देऊन बळजबरीने बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच २० सप्टेंबर २०१७ रोजी त्याने पहिल्या पिडीतेच्या अल्पवयीन मामे बहिणीशीही हा प्रकार केल्याने ही घटना उघडकीस आली होती. भाचीने आपबिती कथन केल्याने पहिल्या पिडीतेच्या आईने दोन्ही मुलींना सोबत घेवून दिंडोरी पोलीस ठाणे गाठल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरी पोलीसांना माळी यास अटक करून त्याची गुह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली होती. दोन्ही गुह्यांचा एकत्रीत खटला विशेष पोस्को न्यायालयात चालला. सरकार तर्फे अॅड दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपीस दहा वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावल्या. दोन्ही गुह्यात विविध कलमान्वये वेगवेगळ््या शिक्षा सुनावल्या. मात्र या शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या आहेत.