नाशिक : वेगवेगळया गुन्हयात गेल्या काही वर्षापासून गुंगारा देणा-या दोघांसह एका तडीपारास बुधवारी (दि.१७) पोलीसांनी जेरबंद केले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. फरार असलेल्यापैकी एक चार वर्षांपासून तर दुसरा तब्बल बारा वर्षा पासून गुंगारा देत होता. संबधीतांना अनुक्रमे सातपूर आणि अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
मधुकर गंगाधर जाधव (४७ रा. राजीव गांधी नगर,गोवर्धन),विजय माधव सदावर्ते (२९ रा.रमाबाई आंबेडकरनगर,अंबड) आणि गणेश राजेंद्र जाधव (२५ रा.गाजरे हॉस्पिटल जवळ,शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून मधुकर जाधव व विजय सदावर्ते हे फरार होते. तर गणेश जाधव यास शहर जिह्यातून हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. मधुकर जाधव याने सन.२००९ मध्ये आपल्या साथीदारांसह प्रविण जाधव (रा.गोवर्धनगाव) यांच्या ताब्यातील एमएच १२ क्यू ए ९६६१ हा मालट्रक अंबड लिंकरोडवर पंक्चर झाल्याने उभा केला असता तो चोरीस गेल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात प्रविण जाधव यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र मधुकर जाधव पसार झाला होता. तब्बल बारा वर्षानंतर ते पोलीसांच्या हाती लागला असून, शहागांव ता. सिन्नर येथे त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. युनिटचे हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून संशयीतास सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. तर विजय सदावर्ते हा गेल्या गेल्या चार वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता. विजय सदावर्ते आणि त्याचा भाऊ संजय उर्फ नाथा सदावर्ते यांनी ८ आॅक्टोबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास रियाज इब्राहिम मलानदार यास जीवे ठार मारण्याच्या इराद्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर विजय सदावर्ते पसार झाला होता. युनिटचे शिपाई योगेश सानप यांना मिळालेल्या माहितीवरून त्यास वडाळा पाथर्डी मार्गावरील गुरूगोविंद सिंग कॉलेज जवळील सराफ लॉन्स भागात जेरबंद करण्यात आले. तर गणेश जाधव या तडिपाराच्या मुसक्या त्याच्या घरपरिसरात आवळण्यात आल्या. गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी गणेश जाधव यास शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच युनिटचे हवालदार राजाराम वाघ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयीत राहत असलेल्या शिवाजीनगर येथील गाजरे हॉस्पिटल परिसरात मिळून आला. तडिपार आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई युनिट २ चे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळया पथकांनी केली.