नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी तिसऱ्या लाटेबाबत वैज्ञानिकांचे एकमत होत नाहीये. संशोधन संस्थांचे वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध होऊन त्यात तिसऱ्या लाटेबाबत निष्कर्ष सांगितले जात आहेत. काहींच्या अहवालात तिसरी लाट येऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, तर काहींच्या अहवालात तिसरी लाट कधी येईल याबाबत मतभेद आहेत. एसबीआय संशोधन संस्थेने तिसऱ्या लाटेबाबत संशोधन केले आहे. एसबीआयच्या अहवालानुसार ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ शकते. एका महिन्यानंतर तिसर्या लाटेचा पीक वाढू शकतो, असे एसबीआयने म्हटले आहे.
लसीकरणानंतरही रुग्णवाढ
अहवालानुसार, सात मेस दुसर्या लाटेचा पीक आला होता. जुलैच्या दुसर्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्येचा स्तर प्रतिदिवस दहा हजारांपर्यंत येऊ शकतो. जगभरातील अनेक देशात लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. अहवालात इस्त्रालयचे उदाहरण देण्यात आले. त्यानुसार, इस्त्रायलमधील ६० टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. इस्त्रायलमधील १२-१८ वर्षांच्या ३३ टक्के मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. २३.८ टक्के मुलांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तरीही जून महिन्याच्या अखेरपर्यंत इस्त्रायलमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
कमी लसीकरण
भारतात आतापर्यंत फक्त ४.६ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. तसेच २०.८ टक्के लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. अमेरिका, ब्रिटेन, इस्त्रालय, स्पेन, फ्रान्समधील लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे.
समृद्ध राज्यांमध्ये अधिक रुग्ण
अहवालानुसार, अधिक समृद्ध किंवा श्रीमंत देश किंवा प्रतिव्यक्ती अधिक श्रीमंत राज्यांमधील जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा आणि राजस्थानसारख्या कमी प्रगत राज्यांमध्ये प्रति १० लाख लोकांमागे मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेशच्या तुलनेत कमी होते. अमेरिका, ब्रिटेन, चीन, जापान, पोलंड, पोर्तुगाल, रशियामध्ये डेल्टा स्ट्रेन आढळला आहे.
घट अपेक्षित
ब्रिटेनमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. भारतात १२ राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये कोरोनाचे ४५००० नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान २१ दिवसापर्यंत ४५००० च्या आसपास नवे रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्येत वेगाने घट झाली होती.