इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक – भाग ३
ग्रोसरी ऑफ द वर्ल्ड
नाशिक हे मुंबईचे किचन आहे असे आपण आजवर बोलत होतो किंवा ऐकत होतो. मात्र, नाशिक हे जगाचेच किचन आहे. हो, तुम्हाला हे वाचून कदाचित नवल वाटेल पण हे खरे आहे. नाशिकमधून फळे, भाजीपाला, फुले, मटण, शेळ्या आणि अशा कितीतरी बाबी निर्यात होत आहेत. आज आपण याच नाशिकच्या अफाट क्षमतेविषयी जाणून घेऊ…
साधारण आठ वर्षांपूर्वी माझा मित्र क्षितीज अग्रवाल नावाजलेल्या सिटी बँकेमध्ये मोठ्या पदावर होता. त्याचे नॅशनल लेव्हलला प्रमोशन होणार होते. ज्यावेळेस तो मला भेटायला आला आणि आमच्या चर्चे दरम्यान त्याने मला सांगितले की, तो बँकिंग क्षेत्र सोडून ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्ये काम करणार आहे. त्याचे हे बोलणे ऐकून मी तर हादरलोच. एवढ्या चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या पदावर काम करत असतांना अचानक ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्ये जाऊन आता हा काय काम करणार? तर तो म्हणाला की नाशिकच्या विलास शिंदे ह्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक संघटना, “सह्याद्री फार्म्स” या ऍग्रीकल्चर कंपनी मध्ये काम करणार आहे.
माझ्या माहितीनुसार, शेतीचे उत्पन्न हे बेभरवशाचे आणि ऍग्रीकल्चर कंपनी म्हणजे तोट्यात चालणारे व्यवसायिक मॉडेल आहे. या क्षेत्रामधील सर्व कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत आलेले आहे. साधारण २०१३-१४ पर्यंत अशा एफपीओ (फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन) म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना या नुकसानीतच चालत होत्या आणि शेतीसारख्या अनिश्चित व्यवसायात २-३ वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे एकदा तरी मोठे नुकसान होतेच. मी क्षितिजला समजविण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. मला म्हणाला की, “मी सह्याद्री फार्म्स मध्ये रुजू होणार आणि तू पण एकदा विलास शिंदेंना नक्की भेट”.
त्यानंतर असे काही नियोजन झाले की, मला कामाच्या निमित्ताने जर्मनी मध्ये जाण्याचा योग आला. कुठेही गेलो की माझ्या नित्यक्रमानुसार मी त्या शहरातील स्थानिक बाजारातून फळे, भाजीपाला, सॅलड साठी लागणाऱ्या वस्तू खाण्यासाठी विकत घेत असतो. जर्मनीच्या म्युनिच शहरामधील मॉल मध्ये गेलो असताना बघतो काय तर चक्क “सह्याद्री ऍग्रो”चे स्टीकर असलेली द्राक्षे होती. माझ्यासाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. मला क्षितीजने या कंपनी बद्दल सांगितलेले आठवले. आणि तेव्हापासून मी बघतोय की वर्षानुवर्षे सह्याद्री ऍग्रोचा चांगला विकास होत आहे. युरोप मधील काही नावजलेल्या कंपन्यांनी सह्याद्री एग्रो मध्ये गुंतवणूक केलीली आहे आणि ते सर्व सह्याद्री एग्रोचा विकास पाहून खूप खुश आहेत.
नाशिकला आलेल्या माझ्या काही युरोपियन गुंतवणूकदार मित्रांनी मला सांगितले की आम्हाला नाशिकमधील काही शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषी प्रक्रियेवर चालणारी युनिट्सला भेट द्यायची आहे. ज्यांना गुंतवणुकीची अपेक्षा आहे किंवा कमी व्याज दरातील कर्ज हवे आहे. त्यावेळेस माहिती घेत असतांना मला कळाले की आपल्या नाशिक मध्ये केवळ सह्याद्री ऍग्रोच नव्हे तर वरुण ऍग्रो, फ्रेशट्रॉप फ्रुटस, नाशिकचे बेदाणे (मनुका) उत्पादक संघ या सारख्या शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषी प्रक्रियेवर चालणारी युनिट्स आहेत, ज्यांनी या क्षेत्रामध्ये खूप चांगले काम केले आहे. आपल्या नाशिकच्या मनिषा धात्रक यांच्यामुळे नाशिकचे वरुण ऍग्रो टोमॉटो केचअप जगभरात पोहोचले. फ्रेशट्रॉप फ्रुटस सुद्धा आपली फळे ज्युसेस, पल्प, प्युरी इ. उत्पादने जगातील नामवंत कंपन्यांना पुरवित आहेत. “ग्रीन झोन ऍग्रो” पिंपळगावचा ‘बसवंत बेदाणे’ हा अल्पावधीतच एक अतिशय लोकप्रिय ब्रँड बनला आहे.
यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या नाशिकची प्रचंड क्षमता असतांना केवळ बोटावर मोजण्या इतक्याच ८-१० कंपन्यांनी कशी चांगली प्रगती केली आणि इतर शेतकरी उत्पादक संघटना आणि कृषी प्रक्रियेवर चालणारी युनिट्सना त्यांचा विकास का नाही साधता आला? माझ्या अभ्यासानुसार, याचे एक महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी बांधवामधील असमन्वय, कृषी विज्ञानाचा अभाव, शेती मध्ये योग्य तंत्रज्ञानाचा वापर न करणे, एखाद्या पिकाचे अती उत्पादन घेणे, ऐकीव माहितीवर आधारित शेजारच्या बांधावरील शेतकऱ्याने घेतले म्हणून आपणही तेच पीक घेणे, पीकविमा नसणे आणि योग्य प्रकारे आपल्या शेत मालाचे मार्केटिंग न करणे. शेतकरी बांधव विलास शिंदे, मनीषा धात्रक, मयंक टंडन यांच्यासारख्या यशस्वी उद्योजकांकडून सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकतात.
बऱ्याचदा तर अशी परिस्थिती होते की, अति उत्पादन झाल्याने आणि खरेदीदार नसल्याने कांदा, टोमॅटो, द्राक्ष यांचे पीके काढून फेकून देण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. आपल्या नाशिक मध्ये जगातील सर्वात सुपीक जमीन व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतांना दरवर्षी आपला शेतकरी बांधव त्याच त्या चुका करून दुष्टचक्रामध्ये अडकत जातो. आणि आपले नुकसान करून घेतो. सध्या टोमेटोची काय परिस्थिती आहे.
युरोपातील मेडिटेरनियन रिजन पेक्षाही चांगल्या प्रतीचा द्राक्ष आपल्या नाशिकला तयार होत आहे. आज गांवोगावी आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, सर्व जगातील तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. गूगल आणि यूट्यूब वर शेतीविषयक खूप चांगले व्हिडीओ आहेत. शेतकरी बांधव त्यांचा अभ्यास करू शकतात. आपण एवोकॅडो सारखे फळ, ऑर्चिडची फुले, व लिलियमची विविध प्रकारची फुलांची शेती करू शकतो. साधारण १०० रुपये प्रति नगाप्रमाणे काही फुलांची विक्री होते. १५०-२०० रुपये प्रति नग एवोकॅडोची विक्री होते. दुबई, सौदी अरब आणि मध्य पूर्वेत निर्यात होणाऱ्या कोकण, मध्य प्रदेश, बिहार मधील आंब्यांच्या काही जातींची विक्री तर साधारण वीस हजार रुपये प्रति किलो नुसार होते आहे. आपल्याकडे राहुरी कृषी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मध्ये अनेक प्रकारची फळे, भाजीपाला व फुले तयार होतात. त्यांची विक्री हजारो रुपये प्रति किलोनुसार होते. या विद्यापीठामधील तज्ज्ञमंडळी व कृषी अधिकारीकडून सल्ला, मार्गदर्शन सुद्धा आपण घेऊ शकतो. पण दुर्दैवाने बरेच शेतकरी बांधव अशा तज्ज्ञ मंडळीपर्यंत पोहोचतच नाही. आपण जर योग्य तज्ज्ञांचा सल्ला, ऍग्रोनॉमिस्ट कडून मार्गदर्शन घेऊन शेती केली तर नुकसान टाळू शकतो.
एक सूचना देऊ इच्छितो की, शेतामध्ये एकाच प्रकारचे पीक न घेता, शेतीचे छोटे-छोटे प्लॉट करून आपल्या शेती मधून वर्षभर उत्पन्न कसे मिळू शकेल त्याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, फुले यांचे पीक घेतले पाहिजे, जेणे करून आपण एकाच पिकावर अवलंबून राहणार नाही. कुठल्याही एका शेतमालाचे भाव पडले तरी बाकीच्या पिकांमधून भरपाई होऊ शकते. सरसकट होणाऱ्या रोगांपासून पिकांना वाचवू शकतो. एवोकॅडो, ब्रोकोली, चायनीज कॅप्सिकम, पंचतारांकित हॉटेल्स मध्ये लागणारा भाजीपाला यांची बरीच मागणी असते त्यावर लक्ष केंद्रित करून सुयोग्य नियोजनाद्वारे आपण चांगले उत्पन्न मिळवू शकाल.
आपल्या नाशिक महानगर पालिकेतील माजी उपयुक्त शिवाजी आमले हे आता पूर्णवेळ ऍग्रोनॉमिस्ट म्हणून काम करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शना खाली हजारो एकर मध्ये पपईची शेती होत आहे. दुबई, जर्मनी सारख्या देशांमध्ये पपईची निर्यात होत असून शेतकऱ्यांना पपई मधून कमी खर्चामध्ये आणि नियमितपणे चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. माझी बहीण जर्मनी मध्ये वास्तव्यास असून तिकडे आपल्या नाशिकची पपई १५ ते २० युरो मध्ये सुद्धा विकली जातेय. याचा अर्थ आहे की चांगल्या प्रतीच्या फळांना विदेशांमध्ये चांगली मागणी आहे आणि आपण तिथपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
ग्रोसरी ऑफ द वर्ल्ड म्हणजे फक्त भाजीपाला किंवा फळे नव्हे तर आपल्या नाशिक मधील विविध पोल्ट्री फार्म मधून दिवसाकाठी हजारो गाड्या मुंबई जातात. मोठ्या प्रमाणात चिकनचा पुरवठा देखील होत आहे. सुरुवातीला काही लोकांनी त्याचा विरोध केला, परंतु हा सुद्धा शेतकऱ्या संबंधित आणि शेती संलग्न व्यवसाय आहे. आपल्या नाशिकच्या धुमाळ ग्रुप, उद्धव निमसे, उद्धव अहिरे, शैलेंद्र अवस्थी सारख्या उद्योजकांमुळे ह्या पोल्ट्री क्षेत्रामध्ये नाशिकचे सर्वत्र नाव झाले आहे. संपूर्ण मुंबईला लागणाऱ्या अंडी, चिकन, मटणचा ८० ते ९० टक्के पुरवठा नाशिक मधून होत आहे. मध्यंतरी ओझर विमानतळावरून दुबईसाठी कार्गो विमानाद्वारे हजारो जिवंत शेळ्यांची आणि बोकडांची निर्यात करण्यात आली. पावसाळ्यात समुद्रमार्गे जिवंत जनावरांची वाहतूक करणे अवघड असल्याने कंपनीने मालवाहू विमानाद्वारे ती दुबईला पाठविण्याचा निर्णय घेतला होता.
नाशिक मधून दररोज हजारो टन ताजा भाजीपाला, कांदे, टमाटे, हिरवे वाटणे मुंबईला पुरवठा होत आहे, एवढे नाशिकचे महत्व असून अक्षरशः “मुंबईचे किचन” म्हणून नाशिकचा नावलौकिक झाला आहे. नाशिकहून संपूर्ण जगात विविध गोष्टींची निर्यात होत असून संपूर्ण “जगाचे किचन” होण्याची क्षमता आहे. मध्यंतरी सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावलेल्या सुमारे पन्नास ते साठ आंब्याच्या झाडांपासून तब्बल लाखो रुपयांचे उत्पादन घेत बाराशे किलो केशर आंबा प्रथमच अमेरिकेत यशस्वीरीत्या पोहोचवला होता. संपूर्ण “जगाचे किचन” होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक विचार करून, सखोल ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी शेतकरी कुटुंबाने आकाशाला गवसणी घालणारे प्रयोग करत एकरी तीन लाखांची हमी देणाऱ्या निर्यातक्षम केशर आंब्यांची लागवड करून यशोगाथा रचली आहे. हरसूलच्या जवळील ह्या शेतकरी कुटुंबाने मोबाइलचा स्मार्ट वापर करून इस्त्राइल व जर्मन कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करून परिसरात पाच हजार केशर आंब्याची झाडे लावली आहेत. झाडे लावताना त्यांनी जंगली आंबा आणि केशर आंबा यांचे कलम तयार केले. झाडांना सेंद्रीय खते घालणे, फवारणी करतांना रसायनांचा वापर टाळणे, आंबा पिकवितांना कोणतेही रासायन न वापरणे आदी नियम त्यांनी पाळले. वर्तमानपत्राचा कागद वापरून पंधरा दिवसात आंबा पिकविण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी च्या माध्यमातून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गिरीश मोरे सेंद्रीय आणि शाश्वत शेती मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून खूप चांगले काम करीत आहेत. दिंडोरीच्याच विशाल आणि प्रताप बनकर बंधूंनी सुद्धा सेंद्रीय शेतीची कास धरलेली आहे. मिश्र-पीक पद्धती, देशी बियाणे, देशी गो-संगोपन व सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून २५ ते ३० पिकांचे आरोग्यदायी उत्पादन घेत आहेत, शिवाय आपल्या ग्राहकांचे “नेटवर्क” तयार करून त्यांना आरोग्यदायी मालाची थेट विक्री करतांना त्यांनाही समाधान दिले आहे.
आम्ही खास शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी जोडलेल्या व्यावसायिकां साठी “फामृत” नावाचा मोबाईल अॅप बनविला आहे. या अॅपच्या माध्यमातून विविध व्हिडीओ, ब्लॉग द्वारे आम्ही सेंद्रीय शेती, शेतकऱ्यांचे प्रबोधन, प्रशिक्षण, मार्गदर्शन करीत आहोत. शेतकऱ्यांसाठी “फामृत” अॅप हे एक ऍग्री इकोसिस्टिम आहे, अॅपद्वारे शेतकऱ्यांची शेतीविषयक दैनंदिन दिनचर्या सुलभ होऊन अधिकाधिक सुविधा कशा मिळतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या मदतीने एफ.पी.ओ. (फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन) देखील अधिक शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचू शकतील आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना नवनवीन बाजारपेठ कशी उपलब्ध करून होईल याविषयी आमची टीम सतत कार्यरत आहे.
युरोप आणि इतर देशांमधील गुंतवणूकदार नाशिकच्या कृषी शेत्रात मोठी गुंतवणूक करु इच्छितात, पण आपल्या शेतकऱ्यांना त्यासाठी आपले मनपरिवर्तन करणे अतिआवश्यक आहे. जर जगायचे असेल, तर तंत्रज्ञाना शिवाय पर्याय नाही. या वर्षी अख्ख्या जिल्ह्याने टोमॅटो लावून स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. यापुढे अपेक्षा करतो की, आपण चुकीचे पीक घेऊन जगातील सगळ्यात सुपिक जमीन खराब करणार नाही. चला आपण सर्व आपल्या नाशिक जिल्ह्याची माती नाविन्यपूर्ण अप्रतिम पिके घेऊन अजून सुपिक करूया.
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत.
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Column Vision Nashik Grocery of the world by Piyush Somani