इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
फिफा वर्ल्डकप
कतारला सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा फुटबॉलमधल्या आधुनिकतेसाठी जितकी गाजते आहे तितकीच अनपेक्षित निकालांच्या धक्कातंत्राने देखील गाजत असल्याने या स्पर्धेची बाद फेरी नुकतीच सुरू झाल्यानंतर फुटबॉल चाहत्यांची उत्कंठा प्रचंड शिगेला पोहोचली असल्याचे आपल्याला दिसून येईल. यासंदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…
फिफा (फुटबॉल वर्ल्डकप) ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा ३२ देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. परंतु आता साखळीतले सामने संपल्यानंतर या आठवडयात “रांउड ऑफ १६” या बाद फेरीला सुरूवात झाली. नेदरलॅण्ड, अमेरिका, अर्जेन्टीना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, पोलंड, इंग्लड, सेनेगल, जपान, क्राेएशिया, ब्राझील, द.आफ्रिका, मोरोक्को, स्पेन, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड हे १६ देश या नॉकआऊट राउंडमध्ये आता नशिब आजमावतांना दिसून येतील. परवा ७ तारखेला हा राउंड संपला की क्वार्टर फायनल्सला सुरूवात होईल आणि मग पुढच्या आठवड्यात सेमी फायनल्स आणि १८ तारखेला विश्वविजेता ठरवणारा सामना असा या स्पर्धेचा महत्वाचा कार्यक्रम आणि सामन्यांची मेजवानी आता फुटबॉल चाहत्यांसाठी शिल्लक आहे. आता इथून पुढच्या फेऱ्यांमध्ये ८-४-२-१ या संख्येने संघ पुढच्या फेरीत पोहाचतील आणि मग अशा चाळणीतून १८ डिसेंबरला विश्वविजेता निश्चित होईल.
साखळीत काही दर्जेदार आणि रोमहर्षक लढती बघायला मिळाल्या आणि त्यामुळे काही उलटफेर सुध्दा झाले. चार वेळच्या विजेत्या जर्मनीला ग्रुप ई मध्ये शेवटच्या स्थानावर रहावे लागल्याने या संघाला मिळालेले माघारीचे तिकीट हा साखळीतला क्लॉयमॅक्स ठरलाय. दुसरीकडे जगातील दुसऱ्या क्रमाकांचा संघा असा लौकीक असलेल्या बेल्जीअम संघाला देखील ग्रुप एफ मधून पुढे जाता आलेले नाही. जर्मनी आणि बेल्जीअमचे वैशिष्टय असे की त्यांना तीन सामन्यात एक विजय, एक पराभव आणि एक ड्रॉ मिळाल्याने बाद फेरीसाठी आवश्यक असलेली गुणसंख्या त्यांना जमवता आली नाही. असाच एक आश्चर्यकारक उलटफेर बघायला मिळाला तो पोलंड संघाचा. हा संघ साखळीत अर्जेंटीना कडून २-० ने पराभूत होवून सुध्दा मजबूत गुणसंख्येमूळे रांउड ऑफ १६ मध्ये पोहोचला.
गतविजेता फ्रान्स, अर्जेंटीना, ब्राझील, इंग्लंड आणि स्पेन या संघापैकी एकाला यंदाचा संभाव्य विजेता मानायची चर्चा सुध्या सुरू आहे. या सर्व संघाची खासियत अशी आहे की स्पेनचा अपवाद वगळला तर इतर सर्व संघ या स्पर्धेच्या त्यांच्या गटातले नंबर १ चा संघ ठरून पुढे आले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यापैकी एकालाही साखळीतले तीन सलग सामने जिंकता आलेले नाहीत. स्पेन वगळता इतर संघांना एका पराभवाचा सामना करावा लागलेला असल्याने यापुढचे सामने रंगतदार का होणार आहेत? हेच या आकडेवारीवरून सिध्द होते. फुटबॉलच्या आत्तापर्यतंच्या विश्वचषक स्पर्धांचे हे वैशिष्ट्य राहिले आहे की स्टार खेळाडूंचा भरणा असलेले संघ पुढे जातात आणि
विश्वविजेतेही होतात. यंदा लिओनेल मेस्सी हा अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू या स्पर्धेची दिशा बदलणार अशी चिन्हे असल्याचे बोलले जाते. अर्थात, हे एक भाकित आहे आणि फुटबॉलला भाकितं खोटी ठरवण्याची आवड आहे. त्यामुळे संभाव्य विश्वविजेता निवडणं अवघड आहे. सध्यातरी १६ पैकी कोणता संघ ही बाजी मारताे याचे उत्तर शोधायचे झाल्यास एकच म्हणावे लागेल की, “नंतर बघून ……अभी
तो आप कतार मे हो”
Column Pavilion FIFA Football World Cup by Jagdish Deore