इंडिया दर्पण विशेष – नवोदित
‘उंच’ कामगिरीच्या ध्येयाने झपाटलेला सुनील पावरा
आदिवासी आणि दुर्गम भागात अनेक हिरे दडलेले आहेत. याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येत असतो. खासकरुन खेळाच्या क्षेत्रात चिकाटी लागते आणि तीच या खेळाडूंकडे असते. आज अशाच भागातून आलेल्या सुनिल पावरा या उंच उडीत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडू विषयी आपण जाणून घेऊ…
Pole Vault चा विषय निघाला की मागील पिढीतील लोकांना एकमेव नाव आठवते ते म्हणजे रशियाचा खेळाडू सर्जी बुबका. याचे कारण Pole Vault हा खेळच अनेकांना त्याने केलेल्या अनेक विक्रमांमुळे माहिती झाला. त्याने १९९३ साली मारलेली ६:१० मीटर ही विक्रमी उंच उडी ही त्यावेळी चर्चेचा विषय झाली होती. त्याचा हा विक्रम २०१५ साली फ्रान्सच्या रेनो लवलिन याने ६:१४ मीटर उडी मारुन मोडला. त्याच्या पाचच वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये स्वीडनच्या आर्मांड डुप्लांतिस याने ६:१६ मीटर उडी मारून नवा विक्रम प्रस्थापित केला. तो आजतागायत कायम आहे.
हा इतिहास सांगायचे कारण नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात गेली तीन वर्षे जीव तोडून सराव करीत असलेला सुनील पावरा हा खेळाडू. धडगाव या आदिवासी आणि दुर्गम भागातून तो आला आहे. मात्र त्याला या महागड्या खेळाने पछाडले आहे. प्रशिक्षक संदीप फुकट यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दररोज चार तास Pole Vault या परदेशी खेळात नैपुण्य मिळावे म्हणून घाम गाळीत आहे!
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वापरले जाणारे पोल हा उच्च प्रतीच्या फायबर पासून बनविलेला असतो. त्याची किंमत तीन ते साडेतीन लाख रुपये असते. म्हणूनच या खेळाकडे कुणी फारसे वळत नाही. तो पोल इतका लवचिक असतो की सहसा कितीही वाकविला तरी तूटत नाही. पण मोडला तर खेळच सोडून द्यावा लागू शकतो.
अतिशय गरीब घरातून आलेल्या सुनीलने पूर्वी उंच उडी आणि तिहेरी उडी या खेळात प्राविण्य मिळविले होते. पण त्याच्या शरीराची रचना आणि तंत्र हे पोल Vault साठी अधिक योग्य आहे. असे वाटल्यानेच स्वतः सुनील आणि त्याचे प्रशिक्षक यांनी पोल Vault कडे वळायचे ठरवले आहे. त्यासाठी लागणारा महागडा पोल तर विकत आणणे शक्य नाही आणि प्रायोजकही मिळणे शक्य नाही. हे माहिती असल्याने सुरुवातीला चक्क लवलवता बांबू वापरून संदीप सरांनी सुनीलकडून Pole Vault चे तंत्र घोटून घेतले आहे.
सध्या तो सर्वसाधारण दर्जाच्या भारतीय बनावटीच्या सुमारे लाख रुपये किंमतीचा साधा पोल वापरून सराव करीत आहे. त्यासाठी लागणारी शरीरसंपदा आणि लवचिकता तयार करण्यासाठी नाशिकमधील प्रसिद्ध मल्लखांब प्रशिक्षक यशवंत जाधव त्याला मोफत मल्लखांबाचे धडेही देत आहेत.
गेल्या तीन वर्षांत सुनील हा राज्य आणि विद्यापीठ पातळीवर क्रमांक एकचा Pole Vaulter झाला आहे. तो सध्या ३:४० मीटर इतकी उंच उडी मारतो. त्याचे उद्दिष्ट ४:३० मीटर उडी हे आहे. कारण ही भारतीय संघात येण्यासाठी लागणारी पात्रता उडी आहे. हे उद्दिष्ट तो येत्या सहा ते आठ महिन्यात गाठेल असे त्याचे प्रशिक्षक आत्मविश्वासाने सांगतात. किंबहुना येत्या आशियाई आणि राष्ट्रकुल खेळात नाशिकच्या सुनील पावराचे नाव दिसले तर आश्चर्य वाटू देऊ नका. भारतीय संघात येण्यासाठी सुनील जबरदस्त मेहनत करीत आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी लागणारी जिद्द आणि काटक शरीर याची देणगी आदिवासी मुलामुलींत असतेच. फक्त त्या गुणांना योग्य ती दिशा देण्याचे काम प्रशिक्षकाने करायचे असते. संदीप फुकट हेच काम आपले ध्येय समजून करीत आहेत. सुनील पावरा हे ध्येय आणि त्याच्या स्वतःचे आंतरराष्ट्रीय पदकाचे स्वप्न कसे पुरे करतात हे येता काळच ठरवील.