मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोनदा झालेला लॉकडाऊन आणि त्यानंतर कोरोनाला रोखणाऱ्या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर जगभर असलेले कोविड-१९ चे संकट कमी होर्इल, अशी आस प्रत्येकाला होती. मात्र कोरोनाच्या येणाऱ्या नवनवीन विषाणूंमुळे अद्यापही या रोगाचा धोका टळला नसल्याचे स्पष्ट होते. नव्याने आलेल्या ओमिक्रॉनचा व्हेरीयंटचा देशातील मुलांवर देखील परिमाण होत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती मुंबर्इतील एसआरसीसी हॉस्पिटलमधील बाल चिकित्साचे विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. महेश बलसेकर यांनी दिली.
२६ नोव्हेंबर २०२१ रोजी सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटला वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (एब्ल्युएचओ) ओमिक्रॉन (Omicron, B.1.1.529) असे नाव दिले. त्याचे रुग्ण सापडायला लागल्यानंतर हा अत्यंत संसर्गजन्य व्हेरीयंट असल्याचे एका महिन्याच्या आतच स्पष्ट झाले आहे. आता तो जगभरात पसरला असून संक्रमणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाने मुलांच्या आरोग्यावर देखील परिणाम केला आहे. त्याच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. दोन वर्षांच्या चिंता आणि भावनिक करणाऱ्या परिस्थितीनंतर २०२२ मध्ये मान्य जीवनात परत येण्याची आशा नागरिकांना होती. परंतु ओमिक्रॉनमुळे आता प्रत्येकजण अस्वस्थ झाला आहे. या सर्वांत अनेक पालकांना कोरोनाबाबच्या उत्तरांपेक्षा हा रोग कधी संपेल? मुलांच्या शाळेचे काय? अशा एक ना अनेक प्रश्नांनी घेरले आहे.
पालक मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कशी कमी करू शकतात?
कोरोना सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने मुलांची कुटुंबांकडून काळजी घेण्यात येत आहे, ती काळजी किंवा देखभाल सुरू ठेवणे आवश्यक आहे. मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता, विशेषतः: घरामध्ये आणि जास्त नागरिक असलेल्या ठिकाणी जास्त काळजी घेणे गरेजेचे आहे. लसीचे दोन्ही डोस झाले असले तरीही काळजी घेणे आवश्यक आहे.
कोविड लसींच्या बूस्टर डोसचे काय?
आत्तापर्यंत पुढे आलेल्या निष्कर्षांनुसार, लसीची प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होते आणि ओमिक्रॉनसारख्या प्रकारांपासून संरक्षण होण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक आहेत. आम्हाला आशा आहे की, सर्व वयोगटांसाठी बूस्टर शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे ओमिक्रॉन सारख्या व्हेरीएंटपासून अतिरिक्त संरक्षण मिळेल.
मुलांमध्ये कोविड लसीकरणाचे काय?
कोविडमुळे आता वैद्यकीय गुंतागुंत आणि मृत्यू होण्याचा धोका कमी आहे. मात्र असे असले तरीही मुलांना गंभीर आजार होऊ शकतो आणि त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणामुळे शाळा उघडणे देखील सोपे होर्इल. आमच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश मुले आहेत. त्यांचे लसीकरण न झाल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. लहान मुलांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लस मुलांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक आहेत. नुकतीच सरकारने घोषणा केली आहे की, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविडची लस दिली जाईल. ही अतिशय विचारपूर्वक केलेली रणनीती आहे. अशी अपेक्षा आहे की, लहान मुलांना, विशेषतः: १०-१२ वर्षांवरील आणि त्यानंतर अगदी लहान मुलांनाही लस दिली जाईल. जेव्हा मुलांना लस देण्यास सुरवात होर्इल तेव्हा पालकांनी त्यांच्या मुलांना लस देण्यास अजिबात संकोच करू नये.
ओमिक्रॉनचा प्रभाव असताना शाळा सुरक्षित आहेत का?
मुलांनी शाळेत जाणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ओमिक्रॉनमुळे हे समजण्यासारखे आहे की, सरकार आणि शाळा पालकांना त्यांच्या मार्गदर्शनाबाबत सावधगिरी बाळगतील. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, मुलांना शाळांपेक्षा समाजातून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. युनिसेफने जाहीर केल्याप्रमाणे, कोरोनाची लाट आली तर शाळा सर्वांत शेवटी सुरू कराव्यात आणि नंतर सर्वांत आधी सुरू कराव्यात. आम्हाला आशा आहे की शाळा उघडणे आणि बंद करण्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करताना सरकार येत्या काही दिवसांत सर्वांगीण दृष्टिकोन बाळगेल.