इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत असून आता अनेक देशांमध्ये तिसरी लाट सुरू आहे. त्यातच दोन महिन्यांपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉन विषाणूने युरोपसह अमेरिका आणि आशिया खंडामधील बहुतांश देशांमध्ये हाहाकार माजविला होता. परंतु आता काही प्रमाणात या संसर्गापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून काही देशांमध्ये रुग्ण संख्या देखील कमी होत आहे. तरीही अद्याप भारतासह अनेक देशांमध्ये निर्बंध कायम आहेत. ब्रिटनमध्ये मात्र सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्यात आल्याने युरोपसह अनेक देशांमध्ये या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जगभरात कोरोना विषाणूविरुद्ध युद्ध सुरू आहे. त्याच वेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घोषणा केली आहे की, इंग्लंडमधील कोविड-19 शी संबंधित सर्व निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. तसेच इंग्लंडमधील कोरोना विषाणूबाबत मास्कसह सर्व निर्बंध संपले आहेत. याबाबत आमच्या शास्त्रज्ञांना खात्री आहे की, ओमिक्रॉन लाट राष्ट्रीय स्तरावर आहे. आता नागरिकांना घरून काम करण्याऐवजी कंपनी किंवा ऑफीस मध्ये जाता येईल. खरे म्हणजे ब्रिटनमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला कोरोनाचे दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. मात्र, आता संसर्गाचे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे. जॉन्सनने यापूर्वीच सांगितले होते की, इंग्लंडमधील कोरोना साथीच्या नवीन लाटेशी लढण्यासाठी लादण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटवले जातील.
जॉन्सन यांनी संसदेत सांगितले की, ‘ब्रिटनमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 90 टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस मिळाला आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनची लाट शिखरावर पोहोचल्यानंतर खाली येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार आता निर्बंध हटवत आहे.’
देशातील ओमिक्रॉन बाधितांच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर ब्रिटन सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या कोविड प्लॅन-बी अंतर्गत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यापुढे घरून काम करण्यास सांगितले जाणार नाही. सर्वत्र असलेली मास्क सक्तीही आता मागे घेण्यात आली आहे. मास्क घालण्याचा निर्णय नागरिकांवर सोडण्यात आला आहे. दरम्यान, सरकारकडून अँटी-कोविड लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती देखील लवकरच हटविली जाण्याची शक्यता आहे.