इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चोरी, दरोडा, घातपात, अपघात किंवा खून यासारख्या घटनांमध्ये कोणताही सर्वसामान्य नागरिक भीतीने घाबरून जातो. परंतु प्रसंगावधान राखून या घटनेच्या मुकाबला केल्यास त्यातून मार्ग देखील काढता येऊ शकतो, असे म्हटले जाते. काही वेळा असे प्रसंगावधान राखल्यास आपला जीव वाचून आर्थिक संकट देखील टळू शकते. बिहार मध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे.
बिहारमधील वैशाली शहरात काही बदमाशांनी पिस्तुलाचा धाक दाखवून भर वस्तीतील एक दागिन्यांचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदाराने घाबरून न जाता मोठ्या हिंमतीने चोरट्याला रिकाम्या हाताने पळवून लावले. आता ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे दुकानदार पिता-पुत्राच्या धाडसाचे संपूर्ण बाजारपेठेत कौतुक होत असून या घटनेची महानगरात जोरदार चर्चा होत आहे.
हाजीपूर-महानर मुख्य रस्त्यावर महनर मदन चौका दरम्यान मंगळसूत्र ज्वेलरीचे दुकान असून सायंकाळी दुकानदार जयशंकर प्रसाद त्यांचा मुलगा रतन कुमारसह दुकानात बसलेले होते. त्याच वेळी दागिने घेण्याच्या बहाण्याने एक बदमाश दुकानात पोहोचला. तेथे त्याने तीन-चार मंगळसूत्रे पाहिली आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने मोबाईलऐवजी खिशातून पिस्तूल काढून पिता-पुत्रांकडे रोखले. तसेच त्यांना दुकानांतील इतर दागिने काढून देण्यास सांगितले. त्याच्या अन्य साथीदार मात्र दुकानापासून काही अंतरावर चौकात लपून बसलेले होते.
दरोडेखोराच्या हातात पिस्तूल पाहूनही पिता-पुत्र हिंमत न गमावता रिकाम्या हाताने त्याला पकडण्यासाठी धावले. अचानक दुकानदार पिता-पुत्राचे धाडस पाहून दरोडेखोर घाबरला, आणि दुकानाबाहेर धावत सुटला. मात्र बाहेर लपलेल्या इतर दरोडेखोरांच्या धास्तीने दुकानदाराने आधी शटर खाली केले. थोडयावेळाने मग सगळे नॉर्मल झाल्यावर दुकानदार बाहेर पडले. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दुकानदाराच्या फिर्यादीवरून पोलीस आयुक्त फौजफाट्यासह पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुकानदाराकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि लवकरच दरोडेखोर पकडले जातील, असे आश्वासन दिले. पोलिसांनी चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे.