इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी ८० वर्षांचे होणार आहेत. त्यानिमित्त त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्यांचा कामाचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. तर त्यांच्या वाढदिवशी त्यांना केबीसीच्या सेटवर एक मस्त सरप्राईझ मिळणार आहे, आणि वाढदिवसाचे गिफ्टही.
‘कौन बनेगा करोडपती’चे नवे पर्व सुरू आहे. या पर्वामध्येही बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालक आहेत. आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने ते कार्यक्रमात वेगळीच रंगात आणतात. निर्मात्यांनी या कार्यक्रमाच्या पुढील भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रोमोतून अमिताभ यांना भेट देण्यासाठी खास पाहुणे केबीसीमध्ये उपस्थित आहेत.
या व्हिडिओत अमिताभ बच्चन आलेल्या स्पर्धकांसह गप्पा मारत खेळाची तयारी करताना दिसत आहेत. मात्र, याच दरम्यान खेळ थांबवा हे सांगणाऱ्या अलार्मचा आवाज येतो. अलार्म लवकर कसा वाजला या विचारात ते काही सेकंद उभे राहतात. तेवढ्यात सेटच्या एन्ट्रीगेटवरुन एक आवाज येतो. येणारी व्यक्ती ‘कभी कभी मेरे दिल में ये खयाल आता है’ हे गाणं म्हणत आत येते. ऐकू आलेला आवाज अभिषेकचा आहे हे ते लगेच ओळखतात. अभिषेक बच्चन त्यांच्याजवळ जात त्यांना घट्ट मिठी मारतो. अभिषेकला मिठी मारताच अमिताभ यांच्या डोळ्यात पाणी येते. हा क्षण पाहून उपस्थित सगळेच भावूक होतात. ‘केबीसीच्या मंचावरचे काही मौल्यवान क्षण. जे सर्वांचे अश्रू पुसतात, त्यांच्याच (अमिताभ बच्चन) डोळ्यात अश्रू तरळले’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.
११ ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन ८० वर्षांचे होणार आहेत. या निमित्ताने अभिषेक आणि जया बच्चन केबीसीच्या मंचावर जाऊन त्यांना सरप्राइज देतात. बच्चन कुटुंबियांची उपस्थिती असलेला हा विशेष भाग अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित केला जाणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीव्हीआर सिनेमा यांनी मिळून ‘बच्चन बॅक टू बिगिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत भारतातल्या १७ शहरांमध्ये अमिताभ यांचे ११ सुपरहिट चित्रपट दाखवले जाणार आहेत.
Big B Amitabh Bacchan Emotional Scene KBC Video