हापूस एवढा महाग का झालाय?
ही आहे फळमाशी…
यंदा हापूस आंबा महाग असल्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ऐरवी साधारण ५० ते ६० रुपयांना मिळणारा हापूस यंदा थेट १०० ते १५० रुपयांना विक्री होत आहे. ही भाववाढ नेमकी कशामुळे आहे, त्याचा घेतलेला हा मागोवा…

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
हापूस आंबा महाग असण्यामागे आहे ती फळमाशी. या माशीने यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडलं आहे…ही माशी झाडावर आंबा कच्चा असताना त्यावर बसून आपल्या नांगीने आंब्याच्या वरच्या हिरव्या आवरणात बारीकसे छिद्र पाडून त्यात असंख्य अंडी सोडते…हे छिद्र वरून डोळ्यांनी पाहिलं तरी दिसत नाही…आंबा उतरवला आणि तो पिकायला ठेवला की जसा जसा आंबा पिकत जातो तसतसा त्यावर एक बारीकसा काळा डाग दिसू लागतो…आंबा पिकत चालला की हा डाग मोठ्ठा होत जातो आणि त्यातून मग आळी बाहेर पडते…आणि आंबा फेकून द्यावा लागतो…
माझ्या मागच्या आठवड्यातील कोकण ट्रीप मध्ये मी कोकणातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सड्यावर आंब्याच्या बागांना भेटी दिल्या आणि प्रत्यक्षात त्यांचे काम पाहीले आहे…आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत… यावेळी आंबा उत्पादक शेतकरी याकारणाने अगदी हवालदिल झालेला आहे…
आंब्याचा खरा सिझन सुरू होतो मार्च नंतर आणि नेमकं त्याचवेळी वादळी पाऊस पडला आणि बरेचसे आंबे जमिनीवर गळून पडले आणि या गळून पडलेल्या कच्च्या आंब्यावर या माशीने अंडी घालून मोठ्या प्रमाणात पैदास केली त्यामुळं नुकसान प्रचंड झालं आहे…
या माशीवर कोणताही जालीम उपाय नाही…हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक ट्रॅप लावला जातो ज्यात मुख्यतः नर अडकला जातो आणि मरतो…जास्तीत जास्त फळमाशीचा नर मारला गेला की आपोआप फळमाशीच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिबंध यावा हा त्यामागचा उद्देश… काही प्रमाणात हे यशस्वी होतय पण त्यासाठी हा प्रयोग सगळ्याचं शेतकऱ्यांनी करायला हवा…एका शेतात केला आणि बाजूच्या शेतात हे ट्रॅप लावले नाही तर काहीही उपयोग होत नाही कारण बाजूच्या शेतातली नर-मादी एकत्र येऊन त्यातली फळमाशी ट्रॅप लावलेल्या शेतात येतेच आणि ती या ट्रॅप मध्ये अडकत नाही…
या एका कारणाने यावेळी आंब्याच्या उत्पादनात खूप मोठा परिणाम झालाय…आणि त्यावर शेतकरी काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे… ‘आंबा खराब निघाला, आंबा किडका निघाला…यावेळी आमच्या आंबा चांगला नव्हता… ‘ वगैरे वगैरे आपण सहज म्हणतो पण त्यामागची परिस्तिथी जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न…
अनेक आंब्याच्या बागांना, तिथल्या व्यापारी लोकांना, मजुरांना, शेतकऱ्यांना भेटल्यावर खूप माहिती मिळाली…आपल्या ताटात आमरस म्हणून वाटीत येणारा हा आंबा अनेक खडतर प्रवास केल्यानंतर घरी पोहोचतो… मोहोर आला, कैऱ्या आल्या, आंबा झाडाला लागला, तो तोडला अन् विकला इतकं ते सोपं नाही…आंबा सिझनचे काम केवळ तीन चार महिनेचं असेही नाही…वर्षभर प्रत्येक कलमाची, झाडाची व्यवस्थित देखभाल, निगा राखल्यावरचं सिझन मध्ये आपल्याला आंबा बघायला मिळतो…
जुन महिन्यापासूनच त्यावर काम करायला सुरुवात होते… सिझन संपला की पालापाचोला गोळा करायचा…बाग साफसूफ करायची… कलमाभोवती आळे करून हा पालापाचोला त्यात टाकायचा आणि कपोस्त खत तयार करायचं… एवढच नव्हे तर वेळोवेळी लेंडी खत आणि अनेक प्रकारची खतं टाकायची…मग वेगवेगळ्या फवारण्या…ऑक्टोबर पासूनच त्या सुरू होतात…त्यांचा खर्चही खूप असतो… साधारण एका लिटरला पाच ते सहा हजार खर्च येतो…
एक किडा असा आहे की जो मोहोर लागताचं त्या मोहोराच्या मुळाशी छोटंसं छिद्र करून आत घुसतो आणि तो सगळा मोहोर आतून पोकळ करून टाकतो… मोहोरच संपवला की मग आंबा कसा येणार?… त्यावरही मग काम करावं लागतं…
बरं आंबा आला की मग तो काढायचा खर्च ही खूप आहे…सिझन असल्याने लेबर कॉस्ट अचानक खूप वाढते… कोकणातला आंबा हा बहुतांश कातळावर आणि डोंगर उतारावर असल्याने आंबा उतरवणे हे कमालीचे कष्टाचे काम आहे… बरं आंबा उतरलवा तरी एक एक पाटी किंवा तो आंब्याने भरलेला जड क्रेट डोक्यावर घेऊन सगळा चढ चढून रस्त्यावर आणणे किंवा घरात आणणे हे प्रचंड मेहनतीचे काम आहे…घरात आणला की त्याची वर्गवारी करणे… त्यातला चांगला वाईट शोधणे… ऑर्डर प्रमाणे तो वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पॅक करणे…आलेल्या ऑर्डर प्रमाणे transport शोधून तो त्या गाडीत पुन्हा स्वतःच उचलून पाठवणे हे मोठे काम आहे…
आपण आंब्याची पेटी उघडली आणि त्यात काही आंबे खराब निघाले की फोन उचलतो आणि लगेच तक्रार करतो…बहुतांश आंबा शेतकरी त्यासाठी आधीच दोन चार आंबे पेटीत जास्त तरी टाकतात किंवा आपल्याला त्याबदल्यात पैसे किंवा आंबे देऊ करतात…
बरं आंब्याला भाव मिळतो तो फक्त सुरुवातीच्या काही दोन तीन आठवडयात… अक्षय तृतीया झाली की भाव पडतात आणि मग उत्पादन खर्चा इतकेही पैसे मिळणे मुश्किल होऊन जाते… पडलेल्या भावामुळे आंबा उतरवणेही परवडत नाही…
अशा अनंत अडचणीतून मार्ग काढत हा फळांचा राजा आपल्या घरात येत असतो…
‘हापूस उगाचंच खूप महाग आहे?… एवढे पैसे कशाचे?…यावेळी आंबा खूपच महाग आहे…’ असे म्हणण्याआधी त्याची दुसरी बाजूही समजून घ्यावी म्हणून हा शब्द प्रपंच…