त्र्यंबकेश्वर – वेदमंत्रांचा जयघोष, टाळमृदुंगाच्या साथीने हरिनामाचा गजरात लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्रीनिवृत्तीनाथ महाराज मंदिरावर आज सुवर्ण कळसाची स्थापना मोठ्या उत्साहात, भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. हजारो भाविकांनी या ऐतेहासिक सोहळ्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतला. नाथांच्या मंदिरावर सुवर्ण कलश प्रतिष्ठापित करण्याची अनेक वर्षांची मनोकामना पूर्ण झाल्याने अनेकांच्या डोळ्यात आज आनंदाश्रु तराळले. ‘अजी सोनियाचा दिनु’ म्हणत अनेकांनी हा सुवर्णक्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात बंदिस्त केला.
या कार्यक्रमासाठी पंढरपुर, देहु, आळंदी, सासवड, मुक्ताईनगर यासह महाराष्र्टातील संत घराण्याचे परंपरेचे वंशज, धार्मिक वारकरी सांप्रदायिक किर्तन व प्रवचनकार यांच्यासह मानाच्या दिंड्यांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यांनी या निमित्ताने हजेरी लावली. या सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे प्रशासक मंडळाद्वारे करण्यात आला. ज्ञानोबा माऊलींच्या जेष्ठ बंधु व गुरु यांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धार व पंढरपुर पालखी सोहळा माऊलींच्या प्रमाणेच असावा अशी वारकरी भक्तांची ईच्छा होती. त्या अनुरुपच तीन वर्षांपासून वारकरी भक्तांनी दिलेल्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात आला असून, मंदिरावर सोन्याचा कळस असावा अशीही भाविकांची इच्छा त्यांनीच वर्गणीतून पूर्ण केली. यात ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्याने सुमारे सव्वा कोटी देणगीतून कळसासह धार्मिक कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाला. कळस प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या कालावधीत तीन दिवसीय रुद्रयाग करण्यात आला. बत्तीस पुरोहितांनी यात सहभाग घेतला. दुपारी एक वाजता गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते कळस पूजा करवुन तो बसविण्यात आला. या वेळी ह. भ. प. बंडातात्या कर्हाडकर, पूजक जयंत महाराज गोसावी, प्रशासक विश्वस्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, अॅड. भाऊसाहेब गंभिरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे, पालिका मुख्याधिकारी संजय जाधव उपस्थित होते.
मंदिराच्या समोरील मंडपात या कार्यक्रमाचे समारोप कार्यक्रमात उपस्थित वारकरी, फडकरी, संत प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांचे सत्कार संपन्न झाले. या वेळी व्यासपीठावर महंत सागरानंद सरस्वती, महंत शंकरानंद सरस्वती, ह. भ. प. बाळकृष्ण महाराज देहूकर, बेलापुरकर, माणिक महाराज देहूकर, यांच्या सह निवृत्तीनाथ देवस्थानचे माजी विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला. समाधी मंदिराच्या मंडपासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी प्रसाद योजनेतून मंजुर झाला असुन त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर बाळकृष्ण महाराज देहूकर यांनी ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ यांना त्रंबकेश्वर येथे ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांनी ते आपल्या भावंडांना दिले. ज्ञानदेवाकडून ज्ञानेश्वरीतून शैव व वैष्णव भक्ती एकच असल्याचे सोप्या भाषेतून समाजाला सन्मार्गाला लावले. त्या निवृत्तीनाथ महाराज मंदिरावर सोन्याच्या कळसाची प्रतिष्ठा हा खरोखरच भाग्यदायी सोहळा असल्याचे सांगितले. प्रशासकीय विश्वस्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते यांनी निवृत्तीनाथ सेवेची संधी उपस्थित वारकरी भक्तांनी आम्हाला दिली. आम्ही येथे निच्छित सेवक असुन हा योगायोग सगळ्या भक्तांनी आम्हाला दिल्याने त्यांचे ऋणी असून सतत सेवेत अग्रेसर राहू असे स्पष्ट केले. उपस्थित सगळ्यांनी यात राजकीय स्वरुप न आणता पूर्ण धार्मिक सोहळा संपन्न केल्याने समाधान व्यक्त केले.