नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नाशिक जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. सिन्नरमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)चा प्राचार्य निलेश बबन ठाकूर याला ३० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी एसीबीकडून पुढील कारवाई सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे वॉटर प्रुफींग आणि कोबा करण्याचे काम नियोजित होते. या कामाचे कंत्राट ११ लाख ५१ हजार रुपयांना एका कंत्राटदाराला मिळाले होते. या कामाच्या तीन टक्के रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी संस्थेचा सचिव तथा प्राचार्य निलेश बबन ठाकूर याने कंत्राटदाराकडे केली. तडजोडी अंती ३० हजार रुपयांची लाच निश्चित करण्यात आली. त्यानंतर कंत्राटदाराने एसीबीशी संपर्क केला. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रोडवर नाशिकरोड पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ठाकूरने कंत्राटदाराकडून ३० हाजारांची लाच स्विकारली. त्याचक्षणी एसीबीच्या पथकाने ठाकूरला रंगेहाथ पकडले. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही एसीबीच्या पथकाकडून सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Anti Corruption Raid ACB Bribe ITI Principle
Nashik Sinner