इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीला अनेक देखण्या आणि अभिनयसंपन्न अभिनेत्री लाभल्या. अश्विनी भावे, वर्ष उसगांवकर, किशोरी शहाणे, सुप्रिया पिळगावकर ते अगदी आता आतापर्यंतच्या मृणाल देशपांडे, सायली संजीव, स्पृहा जोशी इथपर्यंत त्याची एक मोठी परंपरा आहे. कालांतराने या अभिनेत्री छोट्या पडद्यावरही झळकल्या. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे. दिग्गज अभिनेता अशोक सराफ यांची पत्नी एवढीच निवेदिता सराफ यांची ओळख नाही. तर त्या स्वतः देखील एक उत्तम अभिनेत्री आहेत.
मराठी चित्रपटांच्या सुरवातीला चार्मिंग अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिले जायचे. अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले असून त्यांचा अभिनय आज देखील कौतुकास पात्र आहे. वयाच्या साठीपर्यंत पोहोचलेल्या निवेदिता सराफ या आजही फिट असून सध्या त्या मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना नुकतंच खास सरप्राईज मिळालं. सेटवर निवेदिता यांचा साठावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
निवेदिता सराफ यांचा ६०वा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी सेटवर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने त्यांच्या टीमने त्यांना खास सरप्राईज दिलं. निवेदिता जेव्हा ‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर पोहोचल्या तेव्हा त्यांचा मेकअपरुम सजवण्यात आला. हे पाहून त्या अगदी भावूक झाल्या. याचा व्हिडीओ स्वतः निवेदिता सराफ यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. निवेदिता सराफ म्हणतात, “काल आमचं पॅकअप उशीराने झालं. तरीही माझ्या टीमने वाढदिवसानिमित्त माझी मेकअपरुम सजवली. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले. त्यांनी हे अगदी उत्तम काम केलं. हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. मी भारावून गेले.”
संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. नंदिनी वैद्य तुमचे विशेष आभार.” असं म्हणत निवेदिता यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदिता सराफ यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Actress Nivedita Saraf Emotional Moment Video