नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कुठलाही विमा काढताना त्रास होत नाही, पण दावा करताना निपटारा व्हायला मात्र उशी होतो, अशी सर्वसामान्य ग्राहकांची तक्रार असते. आता मात्र विमा नियामक प्राधिकरणाने लागू केलेला नवा नियम ग्राहकांसाठीच फायद्याचा ठरणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.
नवा विमा काढताना पूर्वी केवायसी अनिवार्य नव्हते. आता मात्र केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. जीवन विमा, आरोग्य विमा, अॉटोमोबाईल, गृह वा कुठल्याही विम्यासाठी हेच नियम असणार आहेत. हे नियम सुरुवातीला विमाधारकांना त्रासदायक वाटत असले तरीही दावा मागताना त्यांना फायदाच होणार आहे, असे भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे. हे नियम ग्राहकांचा आणि कंपनीचा दोघांचाही ताण कमी करणारे असतील, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लागू करण्यात आलेला हा नवा नियम काय आहे, हे जाणून घेण्याची आता ग्राहकांना आवश्यकता आहे. नवीन नियमामुळे दाव्यांचा निपटारा पटकन होईल. कंपनीला विमाधारकाची ओळख पटविणे सोईये होईल. केवायसी असल्यामुळे विमा कंपनीकडे ग्राहकाची संपूर्ण माहिती असणार आहे. तसेच दाव्यातील सर्व त्रुटी दूर करणेही कंपनीला सोपे होणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बोगस क्लेम अशक्य
नवीन नियमामुळे बोगस क्लेम मुळीच यशस्वी होणार नाहीत. योग्य माणसालाच दाव्याची रक्कम मिळणार आहे. पूर्वी बोगस क्लेम मोठ्या प्रमाणात व्हायचे. आणि चुकीच्या माणसांना विम्याचा लाभ व्हायचा. पण आता या प्रकाराला आळा बसणार आहे.
तीन डोस घेणाऱ्यांना सवलत
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने एक प्रस्तावात कोव्हिडच्या तिन्ही लशी घेणाऱ्यांना विमा पॉलिसीवर सवलत देण्याचा विचार मांडला आहे. तसेच कोरोना काळातील दावे तातडीने निकाली काढण्यासही प्राधिकरणाने सांगितले आहे. कोरोना काळातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी वॉर रूम तयार करण्याच्या सूचनाही प्राधिकरणाने कंपन्यांना दिल्या आहेत.
IRDA New Rule Insurance Claim Process